#NavDurga संस्कृत कवयित्रींच्या मौलिक रचनांचा शोध

नीला शर्मा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

मराठी भाषेची जननी असलेल्या संस्कृतमध्ये स्त्रियांनी केलेल्या काव्यरचनेला ऐतिहासिक मोल आहे. या साहित्याचा शोध घेत त्याचं महत्त्व वर्तमान पिढीला लेख व व्याख्यानांमधून पटवून देण्याचं भरीव कार्य सुनीला गोंधळेकर करतात. 

मराठी भाषेची जननी असलेल्या संस्कृतमध्ये स्त्रियांनी केलेल्या काव्यरचनेला ऐतिहासिक मोल आहे. या साहित्याचा शोध घेत त्याचं महत्त्व वर्तमान पिढीला लेख व व्याख्यानांमधून पटवून देण्याचं भरीव कार्य सुनीला गोंधळेकर करतात. 

भारतीय कवयित्रींच्या साहित्यरचनेची पाळंमुळं वेदकाळात सापडतात. सुमारे दीड हजार वर्षापूर्वी ऋषिकांनी लिहिलेली सूक्त हा तेव्हाच्या सामाजिक-सांस्कृतिक माहितीचा मौलिक दस्तऐवज आहे. या वाङ्‌मयाचा धांडोळा सुनीला गोंधळेकर यांनी घेतला. त्या पुरातत्त्व अभ्यासक व संशोधक आहेत.

संस्कृत कवयित्रीच्या रचनांचा अभ्यास एका स्त्रीनं केल्यामुळे, एरवी पुरुष अभ्यासकांच्या दृष्टीला आलेही नसते, अशा किती तरी पैलूंवर प्रकाश टाकला गेला आहे. 

सुनीलाताई म्हणाल्या, ‘या सूक्तांमध्ये ऋषिकांनी त्यांचं घर, नातेवाईक, स्त्रीत्वाची भावना यांसारख्या विषयांवर लिहिलेलं आहे. स्त्रिया लेखन करू लागल्याच्या उगमकाळाबाबत जागतिक पातळीवर संदर्भ सापडत नाहीत. आपल्याकडचं लेखन हा त्याचा एकमेव पुरावा ठरतो. नंतर उपनिषदकाळात गार्गी व मैत्रेयी या दोन तत्त्वज्ञ स्त्रियांबद्दलची माहिती मिळते.

याज्ञवल्क्‍यांसारख्या थोर ऋषीला गार्गीने सर्वांदेखत प्रश्न विचारले आहेत. याज्ञवल्क्‍यांनी त्यांची संपत्ती दोन्ही पत्नींमध्ये समान वाटून टाकायचं ठरवलं. तेव्हा मैत्रेयीनं विचारलं, की या संपत्तीनं मला आत्मतत्त्वाचा लाभ होईल का? ऋषींचं उत्तर नकारात्मक आल्यावर तिनं, ‘आत्मज्ञानाबद्दल शिकवून माझ्या ज्ञानवैभवात भर घालावी,’ हे सांगितलं.

सुनीलाताई सांगतात, की महाभारतकालीन सुलभा ही जनकराजाला भर दरबारात विद्वानांसमोर प्रश्न विचारायची. त्यानं तिला विचारलं, ‘तू स्त्री असून असे प्रश्न का विचारतेस? ‘तेव्हा तिनं, ‘तत्त्वज्ञानाबाबत आपली चर्चा चालली आहे. आत्म्याला लिंग किंवा जात नसते. कुठलंही द्वैत आत्म्याच्या उन्नतीसाठीच्या प्रयत्नांच्या आड येऊ नये,‘ असं मोठं मार्मिक उत्तर दिलं.

अभिजात वाङ्‌मयनिर्मितीच्या कालखंडापासून (तिसरं - चौथं शतक) ते सतरा - अठराव्या शतकापर्यंत स्त्रियांच्या साहित्यात सुभाषितवजा रचनांप्रमाणे ग्रंथलेखनही सापडतं. राजघराण्यातील स्त्रियांच्या रचनांमधून तेव्हाच्या स्थल-काल-परिस्थितीबद्दल माहिती मिळते. शृंगार, स्त्रीशरीराची  वर्णनं याप्रमाणेच निसर्ग व ऋतूंबद्दलचं लिखाण आढळतं. प्राचीन संस्कृतीचा हा अनमोल ठेवा आपल्या हाती आज लागू शकतो, तो या कवयित्रींच्या अनमोल योगदानामुळेच.

Web Title: NavDurga Navratrotsav Sunila Gondhalekar