#NavDurga शक्तिस्वरूपिणीच्या जागराला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

पुणे - आश्‍विन शुद्ध प्रतिपदा! पहिली माळ! ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात विविध मंदिरांमध्ये देवीची षोडशोपचारे पूजाअर्चा करण्यात आली. घरोघरी कुलाचाराप्रमाणे नागरिकांनी कुलदैवतेच्या तांदळ्याची स्थापना केली.

सार्वजनिक मंडळांनी देवीच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढून घटस्थापना केली. पहिल्या दिवसापासून आदिशक्ती, शक्तिस्वरूपिणी अर्थातच देवीला नारळाचे तोरण, खणानारळाची ओटी भरण्यासाठी देवीच्या मंदिरांत महिलावर्गाने आवर्जून उपस्थिती दर्शविली.

पुणे - आश्‍विन शुद्ध प्रतिपदा! पहिली माळ! ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात विविध मंदिरांमध्ये देवीची षोडशोपचारे पूजाअर्चा करण्यात आली. घरोघरी कुलाचाराप्रमाणे नागरिकांनी कुलदैवतेच्या तांदळ्याची स्थापना केली.

सार्वजनिक मंडळांनी देवीच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढून घटस्थापना केली. पहिल्या दिवसापासून आदिशक्ती, शक्तिस्वरूपिणी अर्थातच देवीला नारळाचे तोरण, खणानारळाची ओटी भरण्यासाठी देवीच्या मंदिरांत महिलावर्गाने आवर्जून उपस्थिती दर्शविली.

ग्रामदैवत तांबडी जोगेश्‍वरी मंदिर, भवानी माता मंदिर, श्री देवी चतुःशृंगी देवी मंदिर, तळजाई माता मंदिर, संतोषी माता मंदिर, पद्मावती देवी मंदिर, काळी व पिवळी जोगेश्‍वरी मंदिर, महालक्ष्मी मंदिर तसेच विविध समाजाच्या देवी मंदिरांत सकाळपासूनच उत्साही वातावरण होते. मंदिरांत आंब्याच्या डहाळ्या, फुलांची तोरणे लावण्यात आली होती.

अभिषेक झाल्यावर काठपदराच्या साड्या आणि आभूषणांनी देवीच्या मूर्तीला सजविण्यात आले. विविध मंदिरांच्या व्यवस्थापनातर्फे दररोज देवीच्या ‘वाहनपूजे’च्या सजावटीचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 
प्रत्येकाचे कुलदैवत निराळे! कोणाचे माहूरची रेणुका देवी, कोणाची कोल्हापूरची अंबाबाई, तर कोणाची तुळजापूरची तुळजाभवानी, तर कोणाचे वणीची सप्तशृंगी, तर कोणाचे अन्य ठिकाणचे कुलदैवत. त्यामुळे पिढ्यांन्‌ पिढ्यांनुसार कुलाचाराप्रमाणे घरोघरी देवीचे चांदीचे टाक, मुखवटे, तांदळ्याचे स्थापना करून घट बसविण्यात आले. सार्वजनिक मंडळांनी ढोलताशाच्या गजरात, बॅंडच्या सुरावटीत देवीची मिरवणूक काढून स्थापना केली. सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात बीव्हीजी ग्रुपचे संचालक हणमंत व वैशाली गायकवाड यांच्या हस्ते घटस्थापना झाली. सर्वत्र सुजलाम्‌ सुफलाम्‌ व्हावे असा संकल्पही करण्यात आला. शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदिरात पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा व जयश्री बागूल यांच्या हस्ते घटस्थापना झाली. 

कोल्हापूरची अंबाबाई आमचे कुलदैवत होय. आमच्या घरी देवीचा टाक असतो. नऊ दिवस नंदादीप असतो. नऊ दिवसांचे उपवासही असतात.
- दीपा तावरे, नोकरदार 

कोल्हापूरची अंबाबाई आमचे कुलदैवत. उत्सवात देवीच्या टाकाची विविधत पूजा होते. ललिता पंचमीला आमच्याकडे पूजा असते. उत्सवात श्रीसूक्त पठणही असते. 
- संगीता ठकार, माजी विश्‍वस्त, कसबा गणपती मंदिर देवस्थान. 

माझ्या माहेरचे कुलदैवत माहूरची रेणुका देवी. माहेरी पिढ्यांन्‌पिढ्यांचा देवीचा तांदळा आहे. त्या तांदळ्याची स्थापना करून घटस्थापना करतो. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ असते. अष्टमीला घागरी फुंकण्याचा कार्यक्रमही असतो. देवीला विविध पदार्थांचा फुलोराही करतात.
- जयश्री देशपांडे, सचिव, श्रीहरिकीर्तनोत्तेजक सभा 

Web Title: NavDurga Navratrotsav Taljai Mata Temple