#NavDurga मक्‍यातून महिलांना हक्काचा रोजगार

Sonali-bende-Vaishali-bende
Sonali-bende-Vaishali-bende

मंचर येथील वैशाली सदाशिव बेंडे पाटील व सोनाली सतीश बेंडे पाटील यांनी आंबेगाव तालुक्‍यातील तीनशेहून अधिक महिलांना बाराही महिने हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी त्यांनी कणसे खरेदीसाठी शेतकऱ्यांबरोबर करार पद्धतीच्या शेतीचा प्रयोगही यशस्वीपणे राबविला आहे.

आंबेगाव तालुक्‍यातील शेतकरी सध्या ऊस शेतीकडे वळाला आहे. शेतीमालाचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस शेतीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे तालुक्‍यातील अनेक शेतमजूर महिलांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे. मात्र, मंचर येथील वैशाली सदाशिव बेंडे पाटील व सोनाली सतीश बेंडे पाटील यांनी तालुक्‍यातील तीनशेहून अधिक महिलांना बाराही महिने हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

वैशाली व सोनाली बेंडे पाटील यांनी शिवसाई स्वयंसाह्यता बचत गटामार्फत व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी उत्पादित कणसे खरेदीसाठी शेतकऱ्यांबरोबर करार पद्धतीच्या शेतीचा यशस्वीपणे प्रयोगही राबविला आहे. उत्पादित दाणे विक्रीसाठीही त्यांनी वेस्टर्न हिल्थ फूड्‌स (WHFL) कंपनीबरोबर करार केला आहे. त्यात तीनशेहून अधिक महिला मक्‍याची कणसे सोलून त्यातील दाने काढून देण्याचे काम करतात. त्यातून प्रत्येक महिलेला सरासरी २०० रुपयांपर्यंत रोजगार मिळत आहे. 

मंचर येथे मल्हार मंगल कार्यालय, बेलसरवाडी, कळंब, कळंबजाई, पिंपळगाव, खडकी, अवसरी खुर्द आदी गावांत केंद्र आहेत. तेथे महिलांना मक्‍याची कणसे सोलण्याचे काम मिळाले आहे. दररोज २५ ते ३० टन कणसापासून दाने वेगळे केले जातात. 

याबाबत वैशाली बेंडे म्हणाल्या, ‘‘मक्‍याचे पीक घेणाऱ्या गरजू शेतकऱ्यांची नावनोंदणी केली जाते. त्यांच्याबरोबर करार पद्धतीची शेती केली जाते. त्यांना प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा केला जातो. शेतकरी कणसे विकायला आमच्याकडे येतात. त्या वेळी बियाणांचा खर्च वजा केला जातो. शेतकऱ्यांना साडेपाच ते सहा रुपये प्रतिकिलो हमीचा बाजारभाव दिला जातो. त्यामुळे शेतकरी मका पिकाकडे वळाले आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मका कणसाची खरेदी वजन करून केली जाते. एक महिला दररोज सरासरी ७० ते ८० किलो कणसे सोलायचे काम करते.

प्रतिकिलो तीन रुपयांप्रमाणे महिलांना पैसे दिले जातात. दर आठ दिवसांनी त्यांच्या मजुरीचा मोबदला दिला जातो. शाश्वत रोजगार मिळत असल्याने महिला समाधानी आहेत’’

थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे वेस्टर्न हिल्थ फूड्‌स या कंपनीबरोबर आम्ही मक्‍याचे दाणे पुरविण्याचा करार केलेला आहे. त्यामुळे बाजारपेठ शोधण्यासाठी आम्हाला धावपळ करावी लागत नाही. पूर्वी आम्ही फक्त ऑगस्ट ते मार्च या आठ महिन्यांच्या कालावधीतच काम करत होतो; पण महिलांच्या मागणीनुसार या वर्षापासून बाराही महिने कणसे सोलण्याचे काम केले जाणार आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांशी संपर्क करून मका पिकाचे उत्पादन दर महिन्याला निघेल, असे नियोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com