माफीच्या साक्षीदारालाही व्हायला हवी होती शिक्षा - अभिजित पुजारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

पुणे - आरोपींनी केलेल्या कृत्याला फाशीची शिक्षाच योग्य होती, चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी माफीच्या साक्षीदारालाही शिक्षा होणे आवश्‍यक होते, असे मत नयना पुजारी यांचे पती अभिजित पुजारी आणि कुटुंबीयांनी व्यक्त केले. पीडित महिलांच्या मदतीसाठी नयना पुजारी यांच्या नावाने धर्मादाय संस्था स्थापन करणार असल्याचेही अभिजित यांनी नमूद केले.

पुणे - आरोपींनी केलेल्या कृत्याला फाशीची शिक्षाच योग्य होती, चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी माफीच्या साक्षीदारालाही शिक्षा होणे आवश्‍यक होते, असे मत नयना पुजारी यांचे पती अभिजित पुजारी आणि कुटुंबीयांनी व्यक्त केले. पीडित महिलांच्या मदतीसाठी नयना पुजारी यांच्या नावाने धर्मादाय संस्था स्थापन करणार असल्याचेही अभिजित यांनी नमूद केले.

न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्याने अभिजित पुजारी, नयना यांची बहीण मनीषा गणबावले, माधुरी जाधव यांनी समाधान व्यक्त करतानाच वास्तवाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजित म्हणाले, 'न्यायालयाच्या निर्णयाबाबत समाधानी असून, अशा प्रकारचे गुन्हे
घडू नयेत यासाठी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. या प्रकारचे गुन्हे घडले तर त्या आरोपींना फाशीसारखीच कठोर शिक्षा द्यायला हवी.

एकूणच यंत्रणा संयम पाहणारी आहे. नागरिकांनीही याचा विचार करायला हवा. वकिलांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यात आरोपीचे वकीलपत्र घेताना सामाजिक जाणिवेचे भान ठेवले पाहिजे. वकिलांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर गुन्हेगार निर्दोष सुटतात आणि पुन्हा गुन्हा करतात. आरोपी राजेश चौधरी हा माफीचा साक्षीदार झाल्याने त्याला दोषमुक्त केले गेले. पण त्यालाही शिक्षा ठोठावणे आवश्‍यक होते. गुन्हा केल्यानंतर खटल्यात माफीचा साक्षीदार होता येते आणि आपण मुक्त होऊ शकतो, असा चुकीचा संदेश जाणे योग्य वाटत नाही.'' महिलांच्या विरोधात होणाऱ्या घटनांत पीडित महिलांना न्याय देण्यासाठी धर्मादाय संस्थेमार्फत काम करण्याचा मनोदय मी केला होता. आजच्या निकालाने नयनाला न्याय मिळाला आहे. यापुढे संस्थेमार्फत इतर पीडित महिलांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही अभिजित पुजारी यांनी सांगितले.

"गेल्या आठ वर्षांपासून आम्ही काय अनुभव घेतोय, याची कल्पना आम्हालाच असल्याचे,' मनीषा गणबावले यांनी नमूद केले. आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे समाधान असले, तरी न्याय मिळविण्यातील ही आमची पहिली पायरी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: nayana pujari rape case result