नाझरे धरण सात वर्षांनी "ओव्हरफ्लो' 

तानाजी झगडे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

जेजुरीपासून जवळ असलेले नाझरे धरण (मल्हार सागर) सन 2013 नंतर म्हणजे सात वर्षांनी आज भरून वाहू लागले आहे. या धरणातून जेजुरीसह पुरंदर व बारामती तालुक्‍यातील सुमारे 50 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे या गावांना दिलासा मिळाला आहे.

जेजुरी (पुणे) : येथून जवळ असलेले नाझरे धरण (मल्हार सागर) सन 2013 नंतर म्हणजे सात वर्षांनी आज भरून वाहू लागले आहे. या धरणातून जेजुरीसह पुरंदर व बारामती तालुक्‍यातील सुमारे 50 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे या गावांना दिलासा मिळाला आहे.

नाझरे धरणाची पाणी साठवण क्षमता 788 दशलक्ष घनफूट (सुमारे पाऊण टीएमसी) एवढी आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र पुरंदर तालुक्‍याचा पश्‍चिम भाग आहे. या परिसरात चांगला पाऊस झाला, तरच कऱ्हा नदी वाहते आणि धरणात पाणी येते. महिनाभर सुरू असलेल्या पावसामुळे कऱ्हा नदीला चांगले पाणी वाहत आहे. त्यामुळे धरण बुधवारी पहाटे पूर्ण क्षमतेने भरून स्वयंचलित दरवाज्यावरून पाणी पडू लागले. पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सध्या थांबल्याने नदीचे पाणी काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे धरण भरून नदीत येणाऱ्या पाण्याचा वेग कमी आहे. सात वर्षानंतर धरणातून पाणी वाहत असल्याने नागरिकांनी धरण पाहण्यासाठी गर्दी केली होती. सकाळपासून नागरिक धरण पाहण्यासाठी येत होते. 

धरणात भाविकांनी टाकलेला प्लॅस्टिक कचरा व नारळाच्या करवंट्या पाण्याच्या दाबाने सांडव्यापाशी आल्या आहेत. सुमारे एक ट्रॉली कचरा कर्मचाऱ्यांनी बाजूला काढला आहे, तरीही अजून काही कचरा गेटमध्ये अडकून पडला आहे. 

पाण्याचे नियोजन आवश्यक 
जेजुरी शहरासह पुरंदर व बारामती तालुक्‍यातील पन्नास गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. यंदा कालव्याला काही आवर्तने मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नाझरे, जवळार्जुन, मावडी कडेपठार, मोरगाव या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला फायदा होणार आहे. नदीवरील बंधारेही भरून राहणार आहेत. त्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. फक्त उपलब्ध पाण्याचे नियोजन होणे आवश्‍यक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nazare Dam was filled after 7 years