राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून भाजपला प्रत्युत्तर; अजित पवारांवरील टीकेची केली परतफेड!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

भाजपचे खासदार बापट आणि जावडेकर यांनी त्यांच्या विकासनिधीतील रक्कम पीएम केअर फंडला दिली आहे. महापालिकेत सत्ता असूनही त्यांनी महापालिकेला निधी का दिला नाही, महापालिकेवर त्यांचा विश्वास नाही का?

पुणे : कोरोनाची आपत्ती असताना, शहरातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या एकूण 11 आमदारांनी विकास निधीतून 1 कोटी 79 लाख रुपये महापालिकेला उपलब्ध करून दिले आहे. मात्र, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि पुण्याचे आहे असे म्हणवणारे प्रकाश जावडेकर यांनी एक रुपयाही महापालिकेला उपलब्ध करून दिलेला नाही, असे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आकडेवारीसह पुढे आणले आहे.

लॉकडाउन का केला, असे पत्रकारांनी बापट यांना सोमवारी सकाळी विचारल्यावर त्यांनी या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच विचारा, त्यांनीच लॉकडाउन लागू केला आहे, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर काही वेळातच जिल्हा विनियोजन समितीमधील (डिपीडीसी) आकडेवारी बाहेर काढत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बापट यांच्यावर पलटवार केला आहे. 

काय करावं या पुणेकरांचं? सगळं बंद तरीही रस्त्यावर वर्दळ सुरूच!​

कोरोना निवारणासाठी चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आमदार निधीतून प्रत्येकी 20 लाख तर, शरद रणपिसे यांनी 12 लाख, भीमराव तापकीर यांनी 10 लाख रुपये, तर तत्कालीन आमदार अनंत गाडगीळ यांनी 7 लाख रुपये महापालिकेला डिपीडीसीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. तर राज्य सरकारने 3 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे कोरोनासाठी डिपीडीसीच्या माध्यमातून 4 कोटी 79 लाख रुपये उपलब्ध झाले आहेत, असे आकडेवारीतून उघड झाले आहे.

विद्यार्थ्यांची पसंती पुण्यालाच; अॅडमिशनवर कोरोनाचा कसलाही परिणाम नाही!​

भाजपचे खासदार बापट आणि जावडेकर यांनी त्यांच्या विकासनिधीतील रक्कम पीएम केअर फंडला दिली आहे. महापालिकेत सत्ता असूनही त्यांनी महापालिकेला निधी का दिला नाही, महापालिकेवर त्यांचा विश्वास नाही का, असा प्रश्न महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दीपाली धुमाळ, नगरसेवक महेंद्र पठारे, शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी एका पत्राद्वारे उपस्थित केला आहे. 

शहरात कोरोना वाढत असताना महापालिकेतील सत्ताधारी काय करीत आहेत. राज्य सरकारने तरी 3 कोटी रुपये दिले आहेत. तरीही भाजपचे खासदार राज्य सरकारवर आरोप करीत आहेत. त्यांनी पुणे शहरासाठी खासदार निधीतून रक्कम उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती, असेही धुमाळ, पठारे, बालगुडे यांनी म्हटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP and Congress criticized Girish Bapat and Prakash Javadekar about Corona fund