'महाजनादेश' नव्हे 'महाजन' आदेश यात्रा; राष्ट्रवादीचा हल्लाबोल!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाजनादेश यात्रा निघणार आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसने या यात्रेचे वर्णन 'महाजन' आदेश यात्रा असे करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

पुणे : शिवसेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रा सुरू केल्यानंतर आता भाजपानेही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्याचे निश्चित केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाजनादेश यात्रा निघणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या यात्रेचे वर्णन 'महाजन' आदेश यात्रा असे करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात भाजपाची महाजनादेश काढण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यानच्या या यात्रेत मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देणार आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून येणाऱ्या नेत्यांचा ओघ वाढतो आहे. चित्रा वाघ, सचीन अहीर, शिवेंद्रराजे, वैभव पिचड यांच्यासारखे नेते भाजपने आपल्याकडे ओढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत असताना किंवा या पक्षाचे आमदार राजीनामा देत असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. महाजन यांचे वर्णन संकटमोचक म्हणून केले जाते.

राज्य सरकारपुढे ज्या ज्या वेळी अडचणी उभ्या राहिल्या त्या त्या वेळी गिरीश महाजन यांची शिष्टाई सरकारच्या कामी आली. त्यामुळे गिरीश महाजन यांचे पक्षातले आणि सरकारमधले महत्त्व वाढले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनाही आपले लक्ष्य बनवल्याचे दिसते. राज्यात जे काही चालले आहे, त्याचे बोलावते धनी गिरीश महाजनच आहेत, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेचा सूर आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबूक पेजवर 'महाजन' आदेश यात्रा...असे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. 

या फेसबूक पेजवर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते.......राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची 'महाजन' आदेश यात्रा सुरु होणार आहे. त्यासाठी खास युपीमधून रथ मागवण्यात आलाय.. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी गेली सहा वर्ष या रथाचा वापर आपल्या यात्रांसाठी वापर केला गेला आहे. पण इतका गाजावाजा करून सुरू करण्यात येणाऱ्या या यात्रेचे साध्य काय असणार आहे? हा खरा प्रश्न आहे. 

गेल्या पाच वर्षात राज्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या...त्याचं उत्तर मुख्यमंत्री देणार का? २५ दिवस महाजन आदेश यात्रा राज्यात फिरणार आहे. पण काय करणार या यात्रेत महाजन जे आदेश देतील ते बोलणार की, आणखी काही असणार...या यात्रेचा शेतकऱ्यांना लाभ होणार का? हे जरा सांगा...या यात्रे दरम्यान तुमचा खरा चेहरा उघड होईल हे मात्र निश्चित...खोटं बोला पण रेटून बोला...हे तुमचं ब्रीदवाक्य जनतेला आता कळलेलं आहे. त्यामुळे कितीही यात्रा काढा आणि काहीही करा, विधानसभा निवडणुकीत खरा जनादेश तुम्हाला मिळेलच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Attacks on Bjp on Mahajandesh Yatara