Vidhan Sabha 2019 : आमदार साहेब मग विकास गेला कुठे : चेतन तुपेंचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

हडपसरचे आमदार सांगतात की, मी मतदार संघासाठी 7 हजार 95 कोटी खर्च करून विकास केला. पण एवढा पैसा खर्च करून आणलेला विकास नेमका गेला कुठे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चेतन तुपे यांनी केला आहे.

हडपसर (पुणे) : हडपसरचे आमदार सांगतात की, मी मतदार संघासाठी 7 हजार 95 कोटी खर्च करून विकास केला. पण एवढा पैसा खर्च करून आणलेला विकास नेमका गेला कुठे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चेतन तुपे यांनी केला आहे.

आमदारांनी केलेल्या विकासाला हडपसरच्या जनतेने कुठं शोधायचं. आमदारांना वर्षाला 2 कोटी निधी मिळतो, पाच वर्षांचा हिशोब धरला तर 10 कोटींची कामे होणे अपेक्षित आहे. गंमत म्हणजे यापैकी 1.60 कोटींचा निधी वापराविना पडून राहिल्याने परत गेल्याची नामुष्की ओढविली आहे. वाट्टेल ती आकडेवारी फेकणाऱ्या आमदारांचा 7 हजार 95 कोटींचा आकडा म्हणजे हडपसरवासियांसाठी मृगजळच ठरलं आहे. भूखंड घोटाळ्यातुन 'मर्सिडीझ'चे श्रीखंड कुणाला मिळाले हे तर ओपन सिक्रेट आहे, अशी टीका चेतन तुपे यांनी विद्यमान आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार योगेश टिळेकर यांच्यावर केली आहे.

चेतन तुपे पुढे म्हणाले की, खंडणी मागून नंतर पाय धरण्याची नामुष्की कोणावर ओढवली हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस निरीक्षकांची बदली कशी झाली हे पण जनता विसरली नाही. ज्या गावात सर्वाधिक विकासकामे झाल्याचा दावा करताय त्या मांजरी गावातल्या बांधकाम घोटाळ्यात कुणाचा हात आहे? माता भगिनींवर हात उगारणाऱ्यांना 'बंधू'प्रेमापायी कोण कोणाला पाठी घालतंय? हे सगळ्या जनतेने बघितलं आहे. यांच्या पोकळ विकासकामांचा डोलारा कधीही कोसळू शकतो हे सय्यदनगर रेल्वेगेट वारंवार दुरुस्ती करावे लागल्याने सिद्ध झाले असल्याचेही तुपे यांनी म्हटले आहे.

आमदारांच्या पापाचा घडा आता भरला असून जनताच त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. हडपसरने मागच्या पन्नास वर्षात स्व. विठ्ठल तुपेंसारखे सचोटीने काम करणारे, विकासगंगा आणणारे नेतृत्व बघितले आहे. गेल्या पाच वर्षात मात्र हा मतदारसंघ हा भ्रष्ट करभाऱ्यांच्या हातात गेला आहे. आदरणीय शरद पवार साहेबांनी माझ्यावर उमेदवारी देऊन विश्वास दाखविला आहे तो मी सार्थ ठरविण्यासाठी निकराचे प्रयत्न करणारस असेही तुपे यांनी नमूद केले. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या सभेत सुमारे 5 हजार लोकांचा जनसमुदाय जमला होता. सभेत बसण्यासाठी खुर्च्या कमी पडल्या. तरीही शेकडो कार्यकर्ते उभे राहून पवारांची सभा शांतपणे एैकत होते. हडपसर विधानसा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन केले होते. तुपे हे सुसंकृत, उच्चशिक्षीत आणी धोरणी आहेत, खासदार कै. विठ्ठल तुपे यांचा राजकीय व सामाजिक वारसा त्यांना लाभला आहे. त्यामुळे मतदार राजा या विधानसभा निवडणूकीत सत्ता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पवार यांनी दाखवला. यावेळी, शरद पवार यांच्या उपस्थितीत स्वराज पार्टी, प्रहार संघटना, पुणे जिल्हा केमीस्ट, लोकमान्य पार्टी यांनी चेतन तुपे यांना पाठींबा दिला.

यावेळी, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, नगरसेवक अशोक कांबळे, फारूख इनामदार, बाबू मुलानी, जयसिंग गोंधळे, बाळासाहेब गोंधळे, प्रशांत सुरसे, नितीन आरू, प्रा. शोएब ईनामदार, हाजी फिरोज, पूनम पाटील, चंद्रकांत कवडे, दिलीप घुले, मनोज घुले यासह महाअघाडीचे कार्यकर्ते, नगरसवेक व पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Candidate Chetan Tupe criticizes on MLA Yogesh Tilekar