लोकसभेसाठी पुण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार - अजित पवार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पुणे - केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारविरोधात जनमत वाढत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत होत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार उभा केला जाईल, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी येथे केली. पुण्याचा खासदार राष्ट्रवादीचाच असेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या भूमिकांबाबत आतापासून चर्चा रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची आघाडी होण्याची शक्‍यता आहे. पुणे लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीचा आग्रह असल्याची चर्चा गेली काही वर्षे राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच पवार यांनीच पुण्याची जागा लढविणार असल्याचे जाहीर केल्याने नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येते. आता लोकसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याची चर्चा सुरू झाली आहे. 

हल्लाबोल आंदोलनानिमित्ताने वारजे येथे राष्ट्रवादीची सभा झाली, त्यावेळी पवार बोलत होते. केंद्र, राज्य सरकारची धोरणे, मंत्र्यांचे गैरव्यवहार मांडतानाच पवार यांनी महापालिकेतील भाजपच्या कारभारावरही सडकून टीका केली. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यपद्धतीचा त्यांनी समाचार घेतला. 

पवार म्हणाले, ""पुण्याच्या समस्या सोडविण्यात भाजपला अपयश आले आहे. भाजपला चांगले काम करणारे अधिकारी नकोसे झाले आहेत. महापालिकेत भाजप सत्तेवर आल्यापासून पाचशे नवे ठेकेदार वाढले असून, ही मंडळी भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक आहेत. पाणी, कचरा, वाहतूक याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही. पुण्यातील काही भागांत गुंडांकडून तोडफोड होत असताना पोलिस काय करीत आहेत. बालगंधर्व पाडण्याचा घाट भाजपने घातला आहे. पुणेकरांनी पाणी कमी का वापरावे, याचे उत्तर दिले पाहिजे. पुणेकरांना पिण्याचे पाणी कमी पडू देणार नाही.'' 

तेव्हा लेखाजोखा पाहू 
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे काम चांगले आहे. त्यामुळे तेथे दुसरे कोणी उमेदवारी मागेल असे वाटत नाही. पण उमेदवारी मागितली जाऊ शकते. तेव्हा उमेदवारांचा लेखाजोखा पाहिला जाईल,'' असे पवार यांनी सुळे यांच्याकडे पहात सांगितले. तेव्हा व्यासपीठासह उपस्थितांत हशा पिकला. खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार राहील. पण या निवडणुकीसाठी एकोपा ठेवा. महापालिका निवडणुकीत एकमेकांचे पाय ओढले तसे आता करू नका, अशा कानपिचक्‍या पवार यांनी इच्छुकांना दिल्या. 

Web Title: NCP candidate from Pune for Lok Sabha - Ajit Pawar