'राष्ट्रवादी'च्या इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

पुणे / बिबवेवाडी : आरक्षणामुळे आम्हाला तिकीट मिळण्याची शक्‍यता कमी असली, तरी अनेक इच्छुकांनी मीच कसा सरस आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांनी मुलाखतीच्या सलग दुसऱ्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पर्वती विधानसभा मतदारसंघासह हडपसर, कसबा, कॅंटोन्मेंट बोर्ड मतदारसंघांतील इच्छुकांनी त्यात लक्ष वेधले.

विरोधकांपेक्षा मी नवीन प्रभागांमध्ये अधिक मताधिक्‍याने निवडून येऊ शकतो, असा नुसताच दावा नाही, तर तशी वस्तुस्थिती आहे, असे सांगत इच्छुकांनी उमेदवारीचे तिकीट मागितले. बिबवेवाडीसह उपनगरातील रस्ते राजकीय झेंड्यांनी फुलून गेले होते. बिबवेवाडीतील रासकर पॅलेसमध्ये या मुलाखती झाल्या. पर्वती, हडपसर, कॅंटोन्मेंट बोर्ड, कसबा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. राष्ट्रवादी व नाना पेठेकडे जाणाऱ्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या रॅलींमुळे रस्त्यावरच कार्यकर्त्यांची आमानेसामने भेट होत होती. त्यामुळे उमेदवाराच्या नावासह पक्षांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. सकाळी साडेआठपासून उमेदवारांच्या रॅली सुरू होऊन, संध्याकाळी उशिरापर्यंत मुलाखती सुरू होत्या. त्यामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती.

रासकर पॅलेसमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, आमदार दिलीप वळसे पाटील, जयदेव गायकवाड, राजलक्ष्मी भोसले, रवींद्र माळवदकर, दीपक मानकर, रूपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मुलाखती घेण्यासाठी उपस्थित होते. अजित पवार यांनी उमेदवारांच्या कपड्यांच्या पेहरावाचीही दखल घेतली. तसेच महिला उमेदवारांचे सासर-माहेर, घरातील, सामाजिक क्षेत्रातील इत्थंभूत माहिती घेत होते.
 
Web Title: ncp candidates demonstrate strength