राष्ट्रवादीची पहिली यादी दोन दिवसांत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू; दोन दिवसांत देणार अंतिम स्वरूप

पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू; दोन दिवसांत देणार अंतिम स्वरूप
पिंपरी - महापालिका निवडणुकीच्या तयारीत राष्ट्रवादी कॉंग्रेस बाजी मारण्याची चिन्हे आहेत. पक्षाची पहिली यादी येत्या दोन दिवसांत तयार होणार आहे. सोमवारी दिवसभर उमेदवारांच्या यादीसाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या विधानसभा मतदार संघानुसार बैठका सुरू होत्या. लवकरच पहिल्या यादीला अंतिम स्वरूप दिले जाईल. त्यानंतर अजित पवार यांच्या संमतीने ती जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व म्हणजे 32 प्रभागांतील बहुतांश नावे निश्‍चित झाली आहेत. प्रत्येक विधानसभा विभागांत चार-पाच ठिकाणी एका जागेसाठी तीन ते चार जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादीचेच दोनपेक्षा जास्त विद्यमान नगरसेवक समोर आले आहेत. उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांच्यात कमालीची चढाओढ सुरू आहे. मात्र, पक्षापुढे असलेला हा तिढा सोडविण्यासाठी बैठका सुरू आहेत. चर्चेतून इच्छुकांची अंतिम नावे निवडण्यासाठी इतरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदार संघानुसार वेगवेगळे नेते इच्छुकांशी पुन्हा-पुन्हा चर्चा करीत आहेत. चिंचवड मतदार संघासाठी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे, भोसरीसाठी विलास लांडे व अजित गव्हाणे, तर पिंपरीसाठी माजी आमदार अण्णा बनसोडे व योगेश बहल इच्छुक उमेदवारांशी चर्चा करीत आहेत. त्या सर्वांचे समन्वयक म्हणून संजोग वाघेरे भूमिका बजावत आहेत. सोमवारी उशिरापर्यंत बैठका संपवून यादीला अंतिम रूप दिले जाणार आहे. त्यानंतर ही यादी अजित पवार यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवारी (ता.18) पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्‍यता आहे.

यादीबाबत दोन मतप्रवाह
उमेदवारांची यादी इतक्‍यात जाहीर करायची की नाही, याबाबत श्रेष्ठींमध्ये दोन मतप्रवाह आहेत. पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने, निवडलेली नावे जाहीर झाल्यावर नाराज इच्छुक बंडखोरी करू शकतात. बंडखोरांचे हे पीक पक्षाकडे या वेळी मोठे असणार आहे. त्यामुळे डोकेदुखी वाढू नये, यासाठी यादी जाहीर करू नये, असे काहींचे मत आहे. ज्यांना अधिकृत उमेदवारी दिली जाईल, त्यांना प्रचारासाठी मोकळे वातावरण मिळण्यासाठी यादी जाहीर केली जावी, असे काहींचे मत आहे. यादी जाहीर करायची नाही, असे ठरल्यास उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी उमेदवाराला पक्षाचा एबी फॉर्म दिला जाईल. मात्र, असे असले तरी, राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवारांची यादी तयार करण्यात आघाडी घेण्याची शक्‍यता आहे.

Web Title: ncp first list at two days