उपमुख्यमंत्री अजित पवार MPSCमध्ये लक्ष घालणार; रोहित पवारांच्या पत्राला दिला रिप्लाय

Rohit_Pawar_Ajit_Pawar
Rohit_Pawar_Ajit_Pawar

पुणे : कोरोना आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचा निकाल यामुळे लांबणीवर पडलेल्या एमपीएससी परीक्षेमुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यातच एमपीएससीने खुल्या प्रवर्गासाठी कमाल मर्यादेची अट घातली आणि एसईबीसीमधून अर्ज केलेल्या उमेदवारांनी खुला किंवा ईडब्लूएस यापैकी एकच प्रवर्ग निवडावा, असं परिपत्रक काढल्यानं अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. त्यामुळे या खचलेल्या उमेदवारांच्या पाठीशी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार पुन्हा उभे राहिले आहेत. 

एमपीएससीने खुल्या प्रवर्गासाठी कमाल मर्यादेची अट रद्द करावी तसेच एसईबीसीतील उमेदवारांनी खुला किंवा ईडब्लूएस यापैकी एकच प्रवर्ग निवडावा, या आशयाचं काढलेलं परिपत्रक मागे घ्यावं, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ही मागणी करतानाच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही एक पत्र पाठवलं आहे. अजितदादांनीही या प्रकरणी लक्ष घालण्याचं आश्वासन दिल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. 

दरम्यान, एमपीएससीने यूपीएससीच्या धर्तीवर पॅटर्न राबवण्याचा  काही दिवसांपूर्वी निर्णय घेतला. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना कमाल मर्यादेची अट घालण्यात आली. या नवीन नियमानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सहा वेळा ही परीक्षा देण्यात येणार आहे. तर ओबीसीच्या उमेदवारांना नऊवेळा आणि अनुसूचित जाती आणि जमातीतील उमेदवारांना संधींची कोणतीही मर्यादा असणार नाही. 

एमपीएससीने खुल्या प्रवर्गासाठी वयाची अट याआधीच घातली आहे, त्यामुळे कमाल संधींची अट घालण्याची गरज नव्हती. यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, असं अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रात रोहित यांनी म्हटलं आहे. 

तसेच एमपीएससीने ४ जानेवारीला नवीन परिपत्रक काढत आणखी एक धक्का दिला. एसईबीसीमधून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी खुला किंवा ईडब्ल्यूएसपैकी एकच प्रवर्ग निवडावा, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. तसेच यासाठी ५ ते १५ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे उमेदवारांचा गोंधळ उडाला आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचं भवितव्य यावर अवलंबून असल्याने त्यांच्या संधी हिरावल्या जातील, असंही रोहित यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com