'राष्ट्रवादी'ने सोडला पुण्याचा हट्ट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

कॉंग्रेसकडून पुण्याचे माजी शहराध्यक्ष मोहन जोशी, आमदार अनंत गाडगीळ यांनी अधिकृतपणे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. कॉंग्रेस पक्षातील उमेदवारांना प्राधान्य देणार की आयात उमेदवारांना संधी देणार, याची आता उत्सुकता आहे. 

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघाचा हट्ट आज सोडल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले, त्यामुळे या जागेवर कॉंग्रेसचा उमेदवार येणार हे निश्‍चित झाले. गेले काही दिवस पुण्याच्या जागेवरून दोन्ही पक्षांत दावे- प्रतिदावे सुरू होते. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत दोन्ही पक्षांत सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेत राष्ट्रवादीने पुण्याच्या जागेचा हट्ट सोडल्याचे स्पष्ट झाले. 

आघाडीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची मुंबईत बैठक सुरू आहे. सहा महिन्यांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जागेवर राष्ट्रवादीचा दावा दाखल करत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यातून उभे राहणार, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर खुद्द पवार यांनी खुलासा करत आपण उभे राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतरही गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी पुण्याच्या जागेवर हक्क सांगितला होता. त्यावर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते पुण्याच्या जागेसाठी पठडीबाहेरचा उमेदवार देणार, असे सांगत होते. त्यात राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण, बांधकाम व्यावसायिक सतीश मगर यांच्यासह इतर नावांवरही चर्चा झडत होती. ही नावे मागे पडून आता मात्र कॉंग्रेसला उमेदवारीसाठी शोधाशोध सुरू करावी लागणार आहे. 

आज झालेल्या बैठकीत पुण्याची जागा राखण्यात कॉंग्रेसला यश आले आहे. नगर, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, नंदुरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या सहा जागांवरून अद्याप दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासोबतही जागावाटपावर आज दोन्ही पक्षांची चर्चा झाली. 

कॉंग्रेसकडून पुण्याचे माजी शहराध्यक्ष मोहन जोशी, आमदार अनंत गाडगीळ यांनी अधिकृतपणे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. कॉंग्रेस पक्षातील उमेदवारांना प्राधान्य देणार की आयात उमेदवारांना संधी देणार, याची आता उत्सुकता आहे. 
 

Web Title: NCP not contest election in Pune Loksabha election