जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांत ‘राष्ट्रवादी’ची सत्ता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

पुणे - जिल्ह्यातील तेरापैकी सात पंचायत समित्यांची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केली आहे. या सर्व पंचायत समित्यांवर निर्विवाद बहुमत सिद्ध करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस हाच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. उर्वरित सहापैकी तीन पंचायत समित्या ताब्यात घेत शिवसेनेने पंचायत समित्यांमध्ये जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळविला आहे. काँग्रेस दोन, तर भाजप केवळ एका पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरला आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झालेल्या पंचायत समित्यांमध्ये आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, मुळशी आणि शिरूरचा समावेश आहे. शिवसेनेने जुन्नर, खेड व पुरंदर पंचायत समित्यांची सत्ता ताब्यात घेतली आहे. या पक्षाने जुन्नरची पंचायत समिती पुन्हा स्वतःकडे कायम ठेवत, अन्य दोन पंचायत समित्यांवर झेंडा फडकविण्यात यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र पुरंदर व खेडची सत्ता गमवावी लागली आहे. इंदापूर व वेल्हे पंचायत समिती पुन्हा एकदा काँग्रेसकडे, तर मावळ पंचायत समिती भाजपकडे कायम राहिली आहे. 

जुन्नरमध्ये सेनेला काँग्रेसचा हात
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने आपापल्या पंचायत समित्यांमध्ये पुन्हा एकदा स्वबळावर सत्ता कायम राखली आहे. शिवसेनेला मात्र जुन्नर व खेड या दोन तालुक्‍यांत काँग्रेसची मदत घ्यावी लागली आहे. या मदतीच्या बदल्यात काँग्रेसला उपसभापतिपद देण्यात आले आहे. त्यामुळेच या दोन्ही तालुक्‍यांत सभापती शिवसेनेचा आणि उपसभापती काँग्रेसचा झाला आहे. पुरंदर पंचायत समितीत मात्र शिवसेनेने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. हवेली पंचायत समितीत उपसभापती निवडणुकीत शिवसेनेचे एक मत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळाले आहे.

पंचायत समित्यांच्या मावळत्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पुरंदर व खेड या दोन पंचायत समित्यांची सत्ता शिवसेनेने हिसकावून घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ताब्यातील पंचायत समित्यांची संख्या एकवरून आता तीन झाली आहे. राष्ट्रवादीने दोन पंचायत समित्यांची सत्ता गमावली असली तरी दौंडची सत्ता मिळविली आहे.

Web Title: NCP in panchayat samittee