साहेबांच्या परीक्षेत कोण होणार पास!

संभाजी पाटील
शनिवार, 28 एप्रिल 2018

सलग सत्ता असली, की सत्ताधाऱ्यांचा सर्वसामान्यांशी संपर्क कमी होतो, जनतेला गृहीत धरण्याची वृत्ती वाढते. असे झाले, की प्रगल्भ मतदार अशा सत्ताधाऱ्यांना घरी पाठवतात. राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आपल्यातली ही चूक लक्षात आलेली दिसतेय. निवडणुका जवळ आल्यानंतर का होईना, हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाच्या नेत्यांनी अख्खे राज्य पिंजून काढले आहे.

सलग सत्ता असली, की सत्ताधाऱ्यांचा सर्वसामान्यांशी संपर्क कमी होतो, जनतेला गृहीत धरण्याची वृत्ती वाढते. असे झाले, की प्रगल्भ मतदार अशा सत्ताधाऱ्यांना घरी पाठवतात. राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आपल्यातली ही चूक लक्षात आलेली दिसतेय. निवडणुका जवळ आल्यानंतर का होईना, हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाच्या नेत्यांनी अख्खे राज्य पिंजून काढले आहे.

लोकसभेच्या इच्छुकांनीही आपापल्या मतदारसंघात तळ ठोकला आहे. एका बाजूला जनतेपर्यंत पोहोचणे आणि दुसऱ्या बाजूला संघटनात्मक पातळीवर बदलाचे काम पक्ष करीत आहे. प्रदेशाध्यक्षपदाचे नाव आज-उद्या जाहीर होईल; पण खरी उत्सुकता आहे ती पुण्याच्या शहराध्यक्षपदाची. पुण्याचा शहराध्यक्ष ठरविण्याचे अधिकार पक्षाचे नेते अजित पवार यांना दिले असले तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या परीक्षेत कोण पास होणार हेच महत्त्वाचे ठरणार आहे.

अजितदादा परदेशात असल्याने शहराध्यक्षपदाची निवड लांबली. शनिवारी ते पुण्यात पोचले की रविवारी पक्षाला नवीन शहराध्यक्ष मिळेल. या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे; पण आगामी निवडणुका लक्षात घेऊन शहरातील पक्षाची स्थिती सुधारण्यास मदत करणारा चेहरा, हाच निवडीचा निकष राहील. शरद पवार, अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे पुणे हे कार्यक्षेत्र असल्याने या तिघांचेही पुण्यावर बारकाईने लक्ष असते.

अजितदादांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. अर्थात, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली तर त्यातील वाटाघाटीत यावर अंतिम निर्णय होईल; पण या घोषणेचा प्रभावही अध्यक्ष निवडीवर होईल. पुण्यातून जर लोकसभा निवडणूक लढवायची असेल, तर शहर पातळीवर संघटनही मजबूत करावे लागणार आहे. या ठिकाणी शहराध्यक्षाची भूमिका महत्त्वाची ठरेल. आतापर्यंत खासदार वंदना चव्हाण यांनी आठ वर्षे शहराध्यक्षपदाची धुरा सांभाळली. दोन महापालिका निवडणुकाही त्यांच्या कारकिर्दीत लढल्या गेल्या.

संघटनेच्या पातळीवर अनेक सकारात्मक निर्णय त्यांनी घेतले; पण निवडणुकीच्या राजकारणात पक्षाला यश मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीत पक्षाला शहरात एकही जागा राखता आली नाही, तर महापालिकेत असणारी सत्ताही गमवावी लागली. या सर्व पार्श्‍वभूमीवर पक्षाला नव्या दमाचा अध्यक्ष हवा आहे. शहराचे वाढलेले स्वरूप, स्थलांतरित आणि बहुभाषक नागरिकांची वाढलेली संख्या, शहरातील भाजपचे वर्चस्व आणि त्यांची मजबूत पक्षबांधणी, नवमतदारांचा निवडणुकीवरचा वाढता प्रभाव या सर्व गोष्टींचा विचार नवीन अध्यक्ष निवडताना करावा लागणार आहे. त्या कसोटीवर इच्छुक उतरणार का, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. जर शरद पवार यांच्या कसोटीवर इच्छुक उतरले नाहीत, तर खासदार चव्हाण यांच्याकडेच पुन्हा शहराध्यक्षपदाची जबाबदारी राहिल्यास आश्‍चर्य वाटायला नको. शहराध्यक्ष निवडताना जसे नाव ठरविताना पर्यायांबाबत अडचणी येत आहेत, त्याच पद्धतीने लोकसभा निवडणूक लढवायचे ठरले तर उमेदवार कोण, याबाबतही येऊ शकतात. कारण अजितदादांच्या घोषणेनंतर पक्षातील व्यक्तींपेक्षा व्यावसायिकांची नावेच जास्त चर्चेत आली. थोडक्‍यात पक्षसंघटनेची राज्य पातळीवर जशी नेतृत्वाची फळी आहे, तशी शहरातही करावी लागेल. तसे प्रयत्न झाले तरच निवडणुकीतील यशाची स्वप्नं पाहण्यात अर्थ आहे.

Web Title: NCP politics sharad pawar ajit pawar