Bihar Election: बिहारमध्ये आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही; शरद पवारांचा टोला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यामुळे बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्याचा दावा केला जातोय.

Bihar Election : पुणे : ''बिहार निवडणुकीत आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही. निवडणूक मुख्यत्वे नितीशकुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी होती. तेजस्वीला संपूर्ण मोकळीक मिळावी म्हणून आम्ही या निवडणुकीसाठी लांब राहिलो. ज्या पद्धतीने तेजस्वीने लढत दिली, यश मिळवले ते आगामी काळात राजकारणातील तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. बिहारमध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही हे खरं आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 

कमी जागा मिळूनही नितीश CM बनतील का? जेडीयूने दिलं उत्तर

शरद पवार पुढे म्हणाले, ''बिहारमधील निवडणुकीत एका बाजूला पंतप्रधान बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचे सर्व नेते प्रचारामध्ये होते, तर दुसर्‍या बाजूला एक अनुभव नसलेला तरुण नेता निवडणूक लढवत होता. त्यामुळे तेजस्वी यादव यांना जेवढ्या काही जागा मिळतायत ती त्यांची अचिव्हमेंट म्हणावी लागेल. तेजस्वी यादव यांच्या या यशामुळे तरुणांना प्रेरणा मिळेल आणि इतरांनाही मार्ग दिसेल.''

जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही
''बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काही जागा लढवत होती; परंतु तेजस्वी यादव यांना मदत व्हावी, यासाठी आम्ही या निवडणुकीकडे फारसं लक्ष दिलं नाही. या निकालाचा परिणाम इतर राज्यांवर कसा होईल? हे सांगता येणार नाही, पण तमिळनाडूमध्ये याचा काही परिणाम होईल, असं वाटत नाही. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये काय होईल हे बघावे लागेल. आरजेडी आणि काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटप कसं ठरलं होतं याबद्दल मला माहिती नाही, त्यामुळे याविषयी बोलता येणार नाही, असंही पवार यांनी सांगितलं.

Bihar Result Live Update: 65 जागांवर चुरस, पारडं कुणाच्या बाजुने झुकणार?

ती गोष्ट लक्ष्यात आणून दिल्याबद्दल धन्यवाद
देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्यामुळे बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्याचा दावा केला जातोय. याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांना खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'आमच्या डोक्यात ही गोष्ट आली नव्हती. ती आणून दिल्याबद्दल धन्यवाद.' 

दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाबाबत पवार म्हणाले
कोरोना व्हायरस पुन्हा पसरू नये, याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. पंतप्रधान, आरोग्य मंत्रालय तसेच अनेकांनी याबद्दल आवाहन केले आहे. त्यामुळे दिवाळी पाडव्याला गोविंद बागेत आयोजित करण्यात येणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोनामुळे यंदा दिवाळीत लोकांना भेटता येणार नसल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP precident Sharad Pawar commented about Bihar Election 2020 results