
Pune News : हवेली बाजार समितीची निवडणूकीसाठी राष्ट्रवादीची तयारी सुरू
इंदापूर : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून गणल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिकच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार तयारी तयारी सुरू झाली आहे.
यासाठी रविवार (ता.12) रोजी दुपारी निसर्ग मंगल कार्यालय गुलटेकडी पुणे येथे पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार,सहकार क्षेत्रातील प्रमुख,तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन,व्हाईस चेअरमन,संचालक मंडळ,दूध संघाचे चेअरमन,
व्हॉइस चेअरमन व संचालक मंडळ,पुणे शहर, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला विरोधी पक्ष नेते अजित पवार करणार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना गारटकर म्हणाले, हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक साधारणपणे 18 वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 29 एप्रिल 2023 मध्ये होत आहे.
यासाठी शेवटी ही बाजार समिती हवेली तालुक्याची आहे. मात्र पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच संपूर्ण जिल्हयाची मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणीच होत असते.यामुळे सर्व पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साधारणत: राजकारणातल्या ज्येष्ठ आणि तरुण अशा दोन्ही पिढ्या, बाजार समितीची निवडणूक न झाल्यामुळे थांबवले गेलेले आहेत.त्यामुळेच या निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्ष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
त्यातच याच तालुक्यातील असलेल्या थेऊर सहकारी साखर कारखाना तोही बंद अवस्थेत असल्यामुळे सहकारात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची काम करण्याची संधी हुकलेली आहे. तसे पाहिले तर हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य अधिकचे आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असणार आहे. असेही गारटकर यांनी सागितले.
या मेळावा बैठकीसाठी शिरूर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पुरंदर हवेली चे तालुका अध्यक्ष भारत झांबरे, खडकवासला हवेली चे तालुका अध्यक्ष त्र्यंबक मोकाशी हे आपापल्या भागामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांना बरोबर घेऊन,प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे रविवारी होत असलेला मेळावा हवेली तालुक्याच्या राजकीय घडामोडीस दिशा देणारा ठरणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती हवेलीच्या सर्व मतदार सभासदांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले आहे.
दरम्यान हवेली तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन गट असून दोन्ही गटाबाबत अजित पवार काय भूमिका मांडणार ? कोणाला उमेदवारी मिळणार ? याकडे मेळाव्यातील सर्व उपस्थितांचे लक्ष असणार आहे.
18 वर्षे का रखडली निवडणूक
हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक तब्बल 18 वर्षांनी होत आहे. निवडणूक रखडण्यामागे या बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळामध्ये एकमेकांवर झालेले आरोप प्रत्यारोप, न्यायालय मध्ये वाद, राज्यांमध्ये झालेली सत्तांतरे, यातून हवेली बाजार समितीचे संचालक बोर्ड बरखास्त करण्यात आले.
ही संस्था हवेली तालुक्यापुरतीच ठेवायची का ? पुणे जिल्ह्यात पुरती मर्यादित ठेवायची ? त्याला राज्यस्तरीय दर्जा द्यायचा का ? राज्यस्तरावर निवडणूक घ्यायची तसेच अनेक लोक यासंदर्भात हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते अजूनही आहेत. शेवटी मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार,बाजार समितीची निवडणूक ही,29 एप्रिल 2023 रोजी,घेणे राज्य सरकारवर बंधनकारक आहे.त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे ही निवडणूक होतआहे.
किती मतदार
आशिया खंडातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समिती साठी 18 संचालक निवडून द्यायचे असून यासाठी सोसायटी मधून 11 जागांसाठी 1655 मतदार, ग्रामपंचायत मधून 4 जागांसाठी .713 मतदार, व्यापारी मधून 2 जागांसाठी 13170 मतदार तर कामगार हमाल मापाडी मधून 1 जागेसाठी 1780 मतदार असणार आहेत.
भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान हवेली तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांशी वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीच्याच गटांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत असताना भाजप या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार याकडेही अनेकांच्या नजरा लागले आहेत.