भोसलेंना गद्दार म्हणायलाही लाज वाटते 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

पुणे - ""आमदार अनिल भोसले यांनी पक्षाबरोबर गद्दारी करायला नको होती. त्यांना एवढे देऊनही त्यांनी हा प्रकार केल्याने त्यांना गद्दार म्हणायलाही लाज वाटते,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदार भोसले यांच्यावर हल्ला चढविला. ""महापालिका निवडणुकीत पुण्याची सूत्रे बहुजनांच्या हाती द्या, मूठभरांच्या आणि खंडणीचे गुन्हे असलेल्यांकडे नको,'' असे आवाहन करीत पवार यांनी पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला. 

महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सारसबाग परिसरात पवार यांची सभा झाली. महापौर प्रशांत जगताप, पक्षाच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, माजी आमदार कमल ढोले-पाटील, माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते. शहरात गेल्या दहा वर्षांत पक्षाने केलेली कामे, त्यामुळे झालेला शहराचा विकास, भविष्यात नियोजन मांडत महापालिकेत एकाहाती सत्ता देण्याचे आवाहन पवार यांनी पुणेकरांना केले. 

ते म्हणाले, ""शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या दहा वर्षांत अनेक विकासकामे केली आहेत. ती पुणेकरांना दिसत आहेत. मेट्रो प्रकल्पाला आमच्या काळात मंजुरी देण्यात आली; परंतु केवळ निवडणूक जिंकण्याच्या हेतूने त्याचे उद्‌घाटन भाजपने आटोपले. केंद्र आणि राज्यात सत्ता असतानाही अडीच वर्षांत भाजपच्या नेत्यांना पुण्यासाठी काहीही करता आलेले नाही. गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकाही नगरसेवकावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत.'' 

चव्हाण म्हणाल्या, ""राज्य सरकारने विकास आराखड्यातील लोकांच्या हिताची सुमारे 390 आरक्षणे काढली आहेत. निवडणुकीची यंत्रणा पक्षाच्या हितासाठी वापरून घेण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे.'' 

बिल्डर केवळ पैसे कमावतात : महापौर 
"बांधकाम व्यावसायिक हा केवळ पैसे कमाविण्याचे काम करतो. या उद्देशाने भारतीय जनता पक्षातील एक बांधकाम व्यावसायिक महापालिकेचा ताबा घेण्यासाठी धडपडत आहे,'' अशा शब्दांत महापौर प्रशांत जगताप यांनी खासदार संजय काकडे यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. ""पक्षात गुंडांना आणून त्यांच्या माध्यमातून निवडणुका लढविण्याचे धोरण या बांधकाम व्यावसायिकाने आखले आहे. ते शहराच्या हिताचे नाही,'' असेही महापौर जगताप म्हणाले. 

वाहतूक कोंडी 
सारसबाग परिसरात अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सभेमुळे परिसरातील वाहतूक विस्कळित झाली. त्यामुळे वर्दळीच्या वेळी म्हणजे, सायंकाळी सहापासून येथील रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी, आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. 

Web Title: NCP start campaigning