Vidhansabha 2019 : पक्षांतराचे धक्के अन्‌ घटता जनाधार 

- संजय मिस्कीन 
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादी काँग्रेस दिग्गज नेत्यांचा पक्ष, पण अनेकांच्या पक्षांतराने नेतृत्वासमोर मोठे आव्हान ठाकले आहे. ग्रामीण जनाधार घटत असताना शहरी वर्चस्वाचा लढा तीव्र होत आहे. दुसऱ्या फळीतील चेहऱयांना संधी द्यावी लागणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस दिग्गज नेत्यांचा पक्ष, पण अनेकांच्या पक्षांतराने नेतृत्वासमोर मोठे आव्हान ठाकले आहे. ग्रामीण जनाधार घटत असताना शहरी वर्चस्वाचा लढा तीव्र होत आहे. दुसऱ्या फळीतील चेहऱयांना संधी द्यावी लागणार आहे. 

1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून 2014 पर्यंत 15 वर्षांत याच पक्षाकडे महाराष्ट्राची सत्ता होती. केंद्रातील सत्तेत दहा वर्षांचा वाटा, सहकारी बॅंकांवर एकहाती वर्चस्व, निम्म्याहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांवर पक्षाचा झेंडा, तरीही गेल्या पाच वर्षांत या पक्षाची झालेली पडझड इतर कोणत्याही पक्षापेक्षा सर्वाधिक ठरली. देशातील राजकीय समीकरणे जुळवण्याची क्षमता असलेले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची "पॉवर' आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना कितपत "ऊर्जा' देऊ शकेल, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

मतदार दुरावत चालले 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी गेल्या काही दिवसांत पक्षाचा झेंडा सोडून भाजप-शिवसेनेची सत्ता जवळ केली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश मतदारसंघात "राष्ट्रवादी'कडे नावाजलेला चेहरा अपवादानेच आढळत आहे. अशा अवस्थेत "राष्ट्रवादी'ला आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. शेतकरी अन्‌ कामगार ही पक्षाची सर्वांत मोठी "व्होट बॅंक'; पण हा मतदारही पक्षापासून दुरावत असल्याचे चित्र 2014 पासून दिसू लागले. ग्रामीण मतदारांवर "राष्ट्रवादी'ची मदार होती. त्यामुळे सुरवातीपासूनच शहरी मतदारांकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. पिंपरी- चिंचवड आणि नवी मुंबईसारख्या महानगरांचा अपवाद सोडल्यास इतर सर्व मोठ्या शहरांत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती यथातथाच होती. 2014 पासून त्यात आणखी भर पडत गेली. 

बालेकिल्ले ढासळले 
सहकार पट्ट्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले होते; पण गेल्या पाच वर्षांत या जिल्ह्यांतून "राष्ट्रवादी'ला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत आहे. पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष संघर्षात या सर्व जिल्ह्यांचे योगदान मोठे राहिले आहे. सध्या कट्टर, उजव्या विचारांच्या पक्षाने मारलेली बाजी "राष्ट्रवादी'साठी आव्हान ठरले आहे. 
एकीकडे घटता जनाधार आणि दुसरीकडे शहरी मध्यमवर्गातील नाराजी या कात्रीत राष्ट्रवादी अडकला असताना पक्षांतर करणाऱ्यांचे धक्‍के सहन करण्याची वेळ 'राष्ट्रवादी'वर आली आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांची वाढते वय आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांचे नवखेपण यातून जनमानसात नव्या दमाचे विश्‍वासार्ह चेहरे देण्याचे मोठे आव्हान आता 'राष्ट्रवादी'समोर आहे. 

नव्या चेहऱ्यांना संधी हवी 
राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक फटका घराणेशाहीमुळे बसला. सामान्य कुटुंबातील नव्या चेहऱ्यांना संधीपासून कायम दूर राहावे लागल्याचा आरोप या पक्षावर होतो. काही अपवाद सोडल्यास घराणेशाहीची मोठी किंमत "राष्ट्रवादी'ला चुकवावी लागली, हे नाकारता येत नाही. काही दिग्गज घराण्यातील नेत्यांनी पक्षांतर करत राष्ट्रवादीला धक्का दिला. अशा प्रस्थापित घराण्यांसमोर नवे नेतृत्व निर्माण करण्याचे आव्हान पक्षाला पेलावे लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP under the threat of declining loyalty of supporters and party workers