बारामतीत विरोधक भुईसपाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

विरोधकांना अपेक्षेपेक्षा कमी मते
या निवडणुकीत विरोधकांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. सोसायटी मतदारसंघात 331 ते 364 मते सहकार परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना मिळाली, तर ग्रामपंचायत गटातही 640 मतांपैकी विरोधकांना 151 ते 168 अशी मते मिळाली. आज सकाळी नऊ केंद्रांचे नऊ टेबल करून मतमोजणी सुरू केल्याने सर्व निकाल वेळेत लागले, सहायक निबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. कुंभार व सहनिवडणूक अधिकारी आर. ए. देवकाते यांनी मतमोजणीचे नियोजन केले.

बारामती- बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसने बिनविरोध सहा जागांव्यतिरिक्त उर्वरित 13 जागांसाठी झालेल्या मतदानातही विरोधकांना भुईसपाट करीत सर्वच्या सर्व 19 जागा जिंकून बाजार समितीवरील आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले.

बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने रयत पॅनेल उभे केले होते. निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी इतर मागास प्रवर्गातून अनिल धोंडिबा हिवरकर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून नारायण महिपती कोकरे, व्यापारी गटातून पुरुषोत्तम तुकाराम गदादे व प्रताप मधुकरराव सातव, हमाल मापाडी मतदारसंघातून नितीन शंकरराव सरक व कृषी प्रक्रिया आणि पणन गटातून सुनील वसंतराव पवार हे सहा जण बिनविरोध निवडून आले होते. यापैकी नितीन सरक यांच्या उमेदवारीवरून चर्चा झाली. मात्र, ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांनी पक्षास सादर केल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्पष्ट केले होते. या सहा जणांच्या बिनविरोध निवडीनंतर उर्वरित 13 जागांसाठी "राष्ट्रवादी'च्या रयत पॅनेल व विरोधकांच्या पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. रविवारी झालेल्या मतदानात सोसायटी मतदारसंघासाठी 1513 मतदारांनी; तर ग्रामपंचायत मतदारसंघासाठी तालुक्‍यातील 640 ग्रामपंचायत सदस्यांनी मतदान केले. आज सकाळी मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर सुरवातीपासूनच "राष्ट्रवादी'च्या रयत पॅनेलने वर्चस्व राखले. विरोधकांपेक्षा अगदी तिप्पट मते मिळवून "राष्ट्रवादी'चे उमेदवार विजयी झाले.
मतदारसंघनिहाय विजय उमेदवार व कंसात त्यांना पडलेली मते : कृषी पतसंस्था म्हणजे सोसायटी मतदारसंघ : रमेश शंकरराव गोफणे (1016), दिलीप बाबूराव जगताप (1008), राजेंद्र महादेव बोरकर (976), बाळू बापूराव खोमणे (973), वसंत बाबूराव गावडे (964), विठ्ठल बाबूराव खैरे (959), अनिल पांडुरंग खलाटे (950). महिला प्रवर्ग - शशिकला प्रतापराव वाबळे (1064), रत्नाबाई भानुदास चौधरी (1033). भटक्‍या विमुक्त जाती, जमाती प्रवर्ग : बाळासाहेब बाबूलाल गावडे (1093). ग्रामपंचायत मतदारसंघ : सर्वसाधारण प्रवर्ग - शौकत सिकंदर कोतवाल (441), दत्तात्रेय गणपत सणस (440). अनुसूचित जाती प्रवर्ग : बापट निवृत्त कांबळे (471).

विरोधकांना अपेक्षेपेक्षा कमी मते
या निवडणुकीत विरोधकांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. सोसायटी मतदारसंघात 331 ते 364 मते सहकार परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना मिळाली, तर ग्रामपंचायत गटातही 640 मतांपैकी विरोधकांना 151 ते 168 अशी मते मिळाली. आज सकाळी नऊ केंद्रांचे नऊ टेबल करून मतमोजणी सुरू केल्याने सर्व निकाल वेळेत लागले, सहायक निबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. कुंभार व सहनिवडणूक अधिकारी आर. ए. देवकाते यांनी मतमोजणीचे नियोजन केले.

सरकारविरोधी धोरणाचा धिक्कार
"ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावरील मतदारांचा गाढा विश्‍वास या निवडणुकीने दाखवून दिला आहे. या तालुक्‍यात कोणीही फिरकले; तरी या तालुक्‍याचा विकास केवळ पवार कुटुंबीयच करू शकतात, यावर सर्वांचाच विश्‍वास या निवडणुकीने अधोरेखित केला. राज्यातील व केंद्रातील सरकारने शेतकरीविरोधी धोरणे राबविली आहेत, त्याचाही धिक्कार मतदारांनी केला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर प्रचंड विश्‍वास दाखविला. या पुढील काळातही नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत असाच विजय मिळेल, अशी खात्री आहे,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले.

Web Title: ncp wins market committee elections in baramati