घरगुती समारंभांसाठी कॅब हवीहवीशी!

Need a cab for home ceremonies
Need a cab for home ceremonies

पुणे - गाडी पार्क करायची अडचण, ड्रायव्हर कामावर आहे का नाही याची चिंता... पाहुणे जास्त आहेत... त्यांच्याकडे बॅगाही आहेत, त्यामुळे घरची गाडी पाठविण्यापेक्षा ‘कॅब’लाच नागरिकांची पसंती मिळत आहे. चार व्यक्तींची त्यांच्या ‘लगेज’सह वाहतूक करण्यासाठी कॅब उपयुक्त ठरत असल्यामुळे लग्न, वास्तुशांत, उद्‌घाटन, स्नेहमेळावे आदी विविध प्रकारच्या घरगुती समारंभांत कॅबवर विसंबून राहणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढू लागली आहे. 

शहरात कॅबची संख्या वेगाने वाढत आहे. त्यातच करिअर म्हणूनही कॅब व्यवसायात उतरणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे. पाहिजे तेव्हा हमखास येणारी गाडी म्हणूनही कॅब लोकप्रिय झाली आहे. कोथरूडमधील अभिजित कुलकर्णी यांच्या घरी नुकतीच वास्तुशांत झाली. या वेळी त्यांचे अनेक नातेवाईक बाहेरगावाहून आले. त्यांनी घरून सगळ्यांना व्हृॉट्‌सॲपवर ‘लोकेशन’ पाठवले. त्या त्या पाहुण्यांनी पुणे स्टेशन, शिवाजीनगर, विमानतळावरून कॅब बुक केली अन्‌ घरी पोचले. परततानाही ते तसेच पोचले. 

नवी पेठेतील अभय कासट यांच्या घरी नुकतेच त्यांच्या भावाचे लग्न झाले. लग्न डीपी रस्त्यावरील एका लॉनवर होते. पाहुणे आल्यावर व्हॉट्‌सॲपवरील लोकेशनमधून कॅबद्वारे घरी विनासायास पोचत होते. तसेच लग्नाच्या दिवशीही घरून कार्यालयात पोचण्यासाठीही ते कॅब वापरत होते. घरातील सामानाची ने-आण करण्यासाठीही त्यांना कॅबची मदत झाली. कासट म्हणाले, ‘‘पाहुणे आल्यावर त्यांना पुन्हा कार्यालयात पोचविण्यासाठी कॅब उपयुक्त ठरली. काही सामानही त्यांच्यासोबत पाठविता आले. आमच्याकडे दोन गाड्या आहेत. पण पाहुणे पुण्यात गाडी चालविताना गडबडतात. त्यामुळे आमच्या गाडीऐवजी कॅब सोईस्कर ठरली. त्यामुळे पाहुणेही वेळेवर आले अन्‌ त्यांच्या प्रवासाची चिंता राहिली नाही.’’

बिबवेवाडीत श्रेया देशमुख यांच्या ब्यूटीकचे नुकतेच उद्‌घाटन झाले. श्रेया यांचे घर सहकारनगरमध्ये. उद्‌घाटनाच्या दिवशी ब्यूटीकमध्ये काही सामान- वस्तू पोचविण्यासाठी कॅब उपयुक्त ठरलीच, पण नातेवाइकांचीही ने-आण सुलभपणे करता आली, त्यामुळे घरगुती कार्यक्रमांमध्ये कॅब उपयुक्त ठरत असल्याचा अनुभव त्यांनी ‘सकाळ’ला सांगितला. 

या पूर्वी पत्ता सगळ्यांना पाठवावा लागे. मग रिक्षाचालक पैसे किती घेईल, कोठे सोडेल, याबद्दल काही शाश्‍वती नव्हती. आता कॅब असल्यामुळे अगदी मध्यरात्रीही प्रवास निर्धोक झाला आहे. मुख्य म्हणजे कॅब सोयीची आहे. घरची गाडी किंवा ड्रायव्हर असलाच पाहिजे, असे काही आता वाटत नाही.
- अभिजीत कुलकर्णी, कोथरूड

कॅब ड्रायव्हर व्हायचे आहे? फक्त मिस्ड कॉल द्या.... 
वेगाने लोकप्रिय होत असलेल्या कॅब व्यवसायात ड्रायव्हर म्हणून काम करण्याची संधी ‘एपीजी ग्लोबल’तर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांनी ७९४१०५५८४५ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यावर त्यांना या बाबतचे संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com