ब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज

संतोष आटोळे 
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

शिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या  सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या ब्रिटीशकालीन शिर्सुफळ तलावाच्या भराववर सध्या काटेरी झाडे झुडपांची वाढ झाली आहे. तलावाची जबाबदारी असणाऱ्या पाटबंधारे विभागाने याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

शिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या  सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या ब्रिटीशकालीन शिर्सुफळ तलावाच्या भराववर सध्या काटेरी झाडे झुडपांची वाढ झाली आहे. तलावाची जबाबदारी असणाऱ्या पाटबंधारे विभागाने याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

ब्रिटीश आमदानीत 1876-77 च्या दुष्काळामध्ये लोकांच्या हाताला काम द्यावे व भविष्यात पाण्याची चांगली सोय व्हावी म्हणून शिर्सुफळ तलावाचे काम हाती घेण्यात आले. रावणगाव व शिर्सुफळ या दोन्ही हद्दीतील सुमारे 834 एकर जमीन या तलावामध्ये गेली. तलावाची पाणी साठवण क्षमता 356.64 दशलक्ष घनफूट आहे.पूर्वी पावसाच्या पाण्यावर तलाव भरत आहे. पुढे  1980 च्या सुमारास खडकवासला धरणाचा नवीन मुठा उजवा कालवा आल्याने तलावात पाणी सोडण्याची सोय झाली. तसेच जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेपैकी शिरसाई उपसा सिंचन योजना कार्यान्वित आहे. याचे पाणी दौंड व बारामती तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावांना शेतीसाठी सोडण्यात येते.असा हा ऐतिहासिक तलाव आता अतिक्रमणे, गाळ, काटेरी झाडे झुडपे या समस्यांनी ग्रासला आहे.

सध्या तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.  याचा पाणी साठवणुकीवर थेट परिणाम झाला आहे. प्रशासन या बाबीकडे डोळेझाक करत आहे. पाटबंधारे खात्याकडे तलावाची जबाबदारी आहे. 

सरकार एकीकडे पाणी आडवा  पाणी जिरवा, जलयुक्त शिवार सारख्या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करत आहे, मात्र दुसरीकडे ऐतिहासिक तलावाच्या संर्वधनाकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

ऐतिहासिक कोनशिलेचे जतन होणे गरजेचे...
सन 1876-77 मध्ये लहानथोर मिळून एकूण 25 हजार 400 लोकांना या तलावाच्या कामावर रोजगार मिळाला. तलाव कामासाठी 1 लाख 58 हजार रुपये खर्च करण्यात आला. तलावाचे काम 1879 मध्ये पूर्ण होऊन त्याचवर्षी पाणी सिंचनासाठी देण्यास सुरुवात झाली. यावेळी पुणे सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता विल्यम क्लर्क होते. हा सर्व तपशील तलावाच्या भिंतीशेजारी असलेल्या कोनशिलेवर नमूद आहे. आताही या कोनशिलेच्या भिंती भक्कम आहेत. मात्र ज्या संगमरवरात हा तपशील कोरण्यात आला तो ‍झिजल्यामुळे सुमारे 25 टक्के मजकूर वाचता येत नाही. ही कोनशीला सध्या काटेरी झुडपांनी वेढलेली आहे.यामुळे कोनशिला नव्याने तयार करण्याची गरज आहे.

Web Title: The need for the conservation of the British Shirsuffal lake