जिल्हावार लोककला अकादमी हवी - डॉ. रामचंद्र देखणे

Dr-Ramchandra-Dekhane
Dr-Ramchandra-Dekhane

पुणे - मंदिरातील कीर्तनाला गर्दी होत नाही; पण तेच कीर्तन रंगमंदिरात असेल, तर गर्दी होते. कारण त्याला रंगमंचीय भव्यता मिळते. सर्व मौखिक कलांची ही स्थिती आहे.

ग्रामीण भागात या कला जिवंत असल्या, तरी त्यांचे जतन करायचे असेल, तर त्या संहिताबद्ध व्हायला हव्यात, तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी लोककला अकादमी निर्माण केली पाहिजे, असे आग्रही मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या १९ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. देखणे भूषविणार आहेत. येत्या शनिवारी (ता.२८) हे संमेलन सुरू होत आहे. त्यानिमित्ताने ‘सकाळ’ने डॉ. देखणे यांच्याशी संवाद साधला. साहित्य, कलांचे संधान आणि लोककलांचे अस्तित्व या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले. कोथरूड येथे शनिवार आणि रविवारी होणाऱ्या या संमेलनात लोकसाहित्य, मराठी भाषा आदी विषयांवर परिसंवाद, तसेच कवी संमेलन, संगीतमय कार्यक्रमही होणार आहेत.

डॉ. देखणे म्हणतात, ‘‘साहित्य आणि कला ही सृजनाची दोन रूपे आहेत. त्यांचे शरीर जरी मनोरंजनाचे असले, तरी आत्मा प्रबोधनाचा आहे. निर्मिती आणि आस्वाद या बाबी एकांतात होत असल्या, तरी आस्वादकांची रसिकता वाढविण्यासाठी लेखक, कलावंत आणि रसिक यांच्यात अद्वैत नाते तयार होण्याची गरज असते, ते अशा संमेलनांतून होत असल्याने त्यांची गरज आणि महत्त्वदेखील आहे. संतसाहित्याचे दालन आपल्याकडे खूप मोठे आहे. या साहित्याने लोकमनाला शब्दसाक्षर केले असले, तरी समाजसुधारकांच्या साहित्याने आपल्याला बुद्धिसाक्षर केले. सुधारकांच्या ग्रंथनिर्मितीवर चिंतन संमेलनांमधून झाले पाहिजे.’’ 

ग्रामीण भागातही साहित्य संमेलन, कला संमेलने झाली पाहिजेत. तिथे लोककला आहेत, त्यांना पूर्वी लोकाश्रय मिळत होता; परंतु पुढे या कलांचे काय, अशी स्थिती येऊ शकेल. जागरण- गोंधळासारख्या अजूनही काही कला लोकाचाराशी जोडल्या गेल्या आहेत. म्हणून त्या जिवंत आहेत. पण पुढील पिढ्यांपर्यंत सर्व मौखिक कला, लोककला पोचविण्यासाठी त्या संहिताबद्ध झाल्या पाहिजेत. साहित्य संमेलनांमध्ये कला ही केवळ आविष्कारापुरती आणली जाते. या कलांमध्येही साहित्य असते, त्यावरही चर्चा-परिसंवाद झाले पाहिजेत, असे डॉ. देखणे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com