बांधकामाचा दर्जा राखण्याची गरज

बांधकामाचा दर्जा राखण्याची गरज

पुणे -  महारेरा कायद्यांतर्गत बांधकामाच्या दर्जाविषयी देखील काही तरतुदी असून, बांधकाम प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाच वर्षांपर्यंत बांधकाम पद्धतीत काही त्रुटी आढळल्यास ग्राहकाला याविषयी ‘रेरा’कडे दाद मागता येते. या त्रुटी येऊ नयेत आणि बांधकाम सुरू असतानाच बांधकाम साहित्याचा दर्जा आणि बांधकाम प्रक्रियेची गुणवत्ता योग्य प्रमाणात राखली गेली तर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या या तक्रारी नक्कीच कमी होतील, असे महारेराचे अध्यक्ष गौतम चॅटर्जी यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण यांच्या तर्फे ‘ट्रेनिंग ऑफ एक्‍स्पर्टस ट्रेनर्स’ या उपक्रमाचे उद्‌घाटन चॅटर्जी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. क्रेडाईचे नियोजित राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, सुहास मर्चंट, रणजीत नाईकनवरे, जे. पी. श्रॉफ, डॉ. डी. के. अभ्यंकर, ऊर्मिला जुल्का, समीर बेलवलकर, कपिल त्रीमल, अभिजित अचलारे, महारेराचे मुख्य तांत्रिक अधिकारी ज्ञानेश्वर हडदरे हे देखील या वेळी उपस्थित होते.

चॅटर्जी म्हणाले, ‘‘महारेराअंतर्गत नोंदणी झालेल्या प्रकल्पांची संख्या ही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. देशात एकूण रेरा कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या बांधकाम प्रकल्पांपैकी पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. 

रेरा कायद्याच्या अंमलबजावणीला महारेराच्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील बांधकाम व्यावसायिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्यामुळेच हे शक्‍य झाले. आज देशात ३५ हजार प्रकल्प रेरा नोंदणीकृत आहेत. त्यापैकी सुमारे १८ हजार प्रकल्प हे महाराष्ट्रातील आहेत. रेरा कायद्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य कायमच अग्रेसर  राहिले आहे.’ 

ट्रेनिंग सेंटरचे उद्‌घाटन
महारेरातर्फे पाचशे तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. सदर उपक्रमात बार बेंडिंग, शटरिंग, रंगकाम, गवंडीकाम, प्लंबिंग आणि इलेक्‍ट्रिकल आदी विषयक प्रशिक्षणाचा समावेश आहे. हे प्रशिक्षक पुढील एक वर्षांत तयार करण्याचा महारेराचा मानस आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी नांदेड सिटी येथे विशेष ट्रेनिंग सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटनदेखील आज चॅटर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. या सेंटरमध्ये सभागृह, वर्कशॉप, टूल्स डिस्प्ले एरिया आणि क्‍लासरूम्स अशा सोईसुविधा उभारण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com