कृषी पर्यटनाला प्रोत्साहनाची गरज - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

लोणी काळभोर - शेतकऱ्यांना शेतीतून मिळणारे उत्पन्न दुप्पट करावयाचे असेल, तर सरकारने कृषी पर्यटन, स्वच्छ दुग्धोत्पादन, सेंद्रिय शेती तीन गोष्टींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यामुळे सामाजिक विकास, शेती उत्पादन वाढ आणि प्रत्यक्षात उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे मत गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. 

भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान अर्थात बायफ संस्थेच्या एक्कावन्नाव्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या उरुळी कांचन येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केसरकर उपस्थित होते. या वेळी बायफचे अध्यक्ष गिरीश सोहोनी, उपाध्यक्ष भरत काकडे, डॉ. अशोक पांडे यांच्यासह संस्थेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि उरुळी कांचन परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. 

केसरकर म्हणाले, ‘‘गुणवत्ता नियंत्रण, प्रमाणीकरण या बाबींचा समावेश असलेले बाजारपेठविषयक धोरण विकसित करण्याबरोबरच, शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोचविणे आवश्‍यक आहे. महिलांच्या बचत गटांचे विकासातील कार्य लक्षात घेता, यापुढे महिलांनाही विकासात सामावून घेणे गरजेचे आहे.’’ 

या प्रसंगी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकातील महिलांचे उत्कृष्ट बचत गट, दुग्ध उद्योजिका, शेतकरी, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ, शोध निबंध स्पर्धेतील विजेते, कर्मचाऱ्यांचे गुणवंत पाल्य, यशस्वी चित्रफिती निर्मात्यांना बक्षिसे देण्यात आली. बायफच्या कामाची माहिती देणारी ‘विकास गाथा’ चित्रफीत दाखविण्यात आली. बायफचा वार्षिक अहवाल, पारंपरिक पशुऔषध मार्गदर्शिका व चित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले. बायफच्या स्टेट बॅंक फेलोशिप कार्यक्रमांतर्गत दोघांनी भंडारा जिल्ह्यातील धीवे गावात धीवे रुरल इनोव्हेशन स्टुडिओची निर्मिती केल्याचे याप्रसंगी सांगितले.

Web Title: Need for promotion of agricultural tourism Deepak Kesarkar