पक्षाची विश्‍वासार्हता वाढायला हवी - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

कोथरूड - जनतेचा पाठिंबा आहे, तोपर्यंत आपण जनमानसात आहोत, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. जनतेच्या सुख- दुःखाशी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे. त्यांच्याबरोबर आपण आहोत, हा विश्‍वास जनतेमध्ये वाढवला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी येथे केले.

कोथरूड - जनतेचा पाठिंबा आहे, तोपर्यंत आपण जनमानसात आहोत, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. जनतेच्या सुख- दुःखाशी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे. त्यांच्याबरोबर आपण आहोत, हा विश्‍वास जनतेमध्ये वाढवला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी येथे केले.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित ‘लक्ष्य २०१७’ प्रशिक्षण शिबिरात कोथरूड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तत्पूर्वीच्या सत्रात ‘सकाळ’चे सहयोगी संपादक सुनील माळी, ‘सजग नागरिक मंच’चे विवेक वेलणकर; तसेच वंदन नगरकर आदींनी मार्गदर्शन केले. महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष आणि खासदार ॲड. वंदना चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली तर पुणे शहर हे भारतातील सर्वोत्तम शहर अशी ओळख आपण निर्माण करू शकू. यासाठी कामाला लागा.’’
माळी म्हणाले, ‘‘प्रदूषण-जल, वायू आणि ध्वनिप्रदूषण, वाहतूक समस्या, शहराचे केंद्रीकरण, झोपडपट्टी, साधन संपत्तीचा अपव्यय आणि कचरा या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. जलप्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाणी प्रकल्पाना चालना देणे गरजेचे आहे. वायुप्रदूषण कमी होण्यासाठी वाहनांची संख्या कमी झाली पाहिजे. पर्यायाने सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा झाली पाहिजे.’’ 

पुण्यातील पर्यावरण, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा, शिक्षण मंडळ आणि महावितरण यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या समस्या याविषयी वेलणकर यांनी विश्‍लेषण केले. कार्यकर्ते आणि नगरसेवकांसाठी व्यक्तिमत्व विकास, भाषण कौशल्य, आत्मविश्‍वास वाढविणे यासाठी वंदन नगरकर यांनी मार्गदर्शन केले. वाचन, अभ्यास आणि निरीक्षण फार महत्त्वाचे आहे; तरच आपण चांगले व्यक्तिमत्त्व बनू शकतो, असे त्यांनी सांगितले. 

स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते शंकर केमसे, माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, सुषमा निम्हण, रोहिणी चिमटे, रंजना मुरकुटे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नीलेश निकम, निरीक्षक हरीश सणस, शिक्षण मंडळ अध्यक्ष वासंती काकडे, शहर उपाध्यक्ष अशोक राठी, कोथरूड अध्यक्ष मिलिंद बालवाडकर, रजनी पाचंगे, रूपाली चाकणकर, अमित अगरवाल उपस्थित होते. 

Web Title: Need to set before the party's credibility

टॅग्स