ध्येयवेड्या विद्यार्थ्यांची  आवश्‍यकता : डॉ. काळे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानार्थी न बनविता शाळेत घेतलेले ज्ञान शाळेबाहेरदेखील उपयोगी पडले पाहिजे. विद्यार्थ्यांनी कल्पनेतून नाही, तर कष्टातून स्वप्ने बघावीत. आपली स्वप्ने साकार करायला कष्टाशिवाय पर्याय नाही. 
-डॉ. शकुंतला काळे, अध्यक्षा, एसएससी बोर्ड 

पुणे : ""अभ्यासक्रमात अनेकदा कालसुसंगत बदल करावे लागतात. समाजाच्या प्रत्येक स्तरावर ध्येयवेडे विद्यार्थी असतील, तर चांगला समाज घडेल,'' असे मत एसएससी बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी व्यक्त केले. 

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या "जय गणेश विद्यार्थी पालकत्व' योजनेतील दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात डॉ. काळे बोलत होत्या. या वेळी प्रा. श्‍याम भुर्के, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, डॉ. अ. ल. देशमुख, अरुण भालेराव, राजाभाऊ सूर्यवंशी, डॉ. संजीव डोळे उपस्थित होते. 

डॉ. काळे म्हणाल्या, ""भावी पिढीला घडविण्याचे काम महत्त्वाचे आहे. अनेकांना बुद्धिमत्ता असूनदेखील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे स्वप्न पाहता येत नाहीत; परंतु अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक उभारी देऊन त्यांच्या स्वप्नांना अर्थ देण्याचे काम ट्रस्टने केले आहे.'' 

प्रा. भुर्के म्हणाले, ""मोठा माणूस बनण्यासाठी प्रथम मातृभाषेत व्यवस्थित बोलता आले पाहिजे. त्यानंतर इंग्रजी आले पाहिजे, संगणकाचे ज्ञान असले पाहिजे. पदवीधर असले पाहिजे. व्यवस्थापन जमले पाहिजे. या सगळ्या गोष्टी असतील तर नक्कीच माणूस मोठा होतो'' 

अशोक गोडसे व गौरी खटावकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: Need Targeted students says Dr kale