तीन मिनिटे उशिरा पोचल्याने माउली नीटला मुकला (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

- अशा घटना इतरांच्या बाबतीत घडू नयेत, यासाठी आपल्या सूचना पाठवा.. फेसबुक आणि ट्विटरवर
- #NeetSuggestions हॅशटॅग वापरून ट्विट करा
- webeditor@esakal.com वर ई-मेल करा

पुणे : नीट परीक्षेसाठी सोलापूरमधून पहाटे एसटीने पुण्याला निघालो. पावणेनऊच्या सुमारास पुण्यात पोचलो. पुण्यात पहिल्यांदाच आल्यामुळे पुण्याविषयी काहीच माहिती नव्हती. कसाबसा पत्ता विचारत धनकवडी गाठली. पण इथले भारती विद्यापीठ शाळेचे केंद्र काही सापडेना. रस्त्याकडेला उभा राहून रडत असताना तेथून कामावर निघालेल्या प्रशांत काळे यांनी मला परीक्षा केंद्रावर सोडले. एवढ्या प्रसंगानंतर केंद्रावर पोचायला फक्त तीन मिनिटे उशीर झाला आणि मला परीक्षेला बसू दिले नाही ! ही व्यथा आहे अकलूजमधील शेतमजुराचा मुलगा असलेल्या माउली करांदे या विद्यार्थ्याची ! 
 

कष्टकरी कुटुंबातील या मुलाने "डॉक्‍टर' होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठीची पहिली पायरी असलेल्या "नीट' परीक्षेसाठी तो पुण्यात आला होता. त्यासाठी सोलापूरहून पहाटेच तो निघाला होता. साधारणत: साडेचार तासांचा एसटी प्रवास करून पावणेनऊच्या सुमारात तो स्वारगेटला पोचला. ऍडमिट कार्डवर असणारी भारती विद्यापीठ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा (परीक्षा केंद्र) कुठे आहे, अशी विचारपूस करत त्याने कसेबसे धनकवडी गाठले. पण इथल्या माणसांच्या आणि इमारतींच्या गर्दीमध्ये त्याला परीक्षा केंद्र काही सापडेना. 

अचानक ओढवलेल्या या परिस्थितीमुळे हताश झालेल्या माउलीला अक्षरशः रडू कोसळले. त्याचे ते हुंदके कामावर निघालेल्या प्रशांत काळे या संवेदनशील व्यक्तीच्या कानावर पडले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यास भारती विद्यापीठ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या केंद्रावर आणून सोडले. त्यावेळी परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार बंद होऊन अवघी तीन मिनिटे झाली होती. घडलेला सर्व प्रकार कथन करून माउली यास काळे यांनी परीक्षेला बसू द्यावे म्हणून अधिकाऱ्यांकडे विनवणी केली. परंतु नियमांचे कारण पुढे करत अधिकाऱ्यांनी त्याला परीक्षेस बसू देण्यास नकार दिला. 

आई-वडील आणि लहान बहीण असा माउलीचा छोटेखानी परिवार. त्याचे वडील अकलूजमध्ये शेतमजुरी करतात. "पोराला डॉक्‍टर बनविण्यासाठी करांदे कुटुंबीय काबाडकष्ट करत आहेत. परीक्षा पद्धतीतील काटेकोर नियम माउलीसारख्या शेतमजुराच्या, कष्टकऱ्याच्या मुलाच्या डॉक्‍टर बनण्याच्या स्वप्नात आडकाठी ठरत असल्याची प्रतिक्रिया काळे यांच्यासह नागरिक व्यक्त करत आहेत. 

पहिल्यांदाच पुण्यात आलो असल्याने पुण्याची काहीच माहिती नाही. नीटच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी वर्षभर खूप मेहनत घेतली. या परीक्षेसाठी दिवस-रात्र एक करून खूप अभ्यास केला. परंतु परीक्षा केंद्र वेळेत न सापडल्यामुळे केवळ तीन मिनिटे उशिरा झाला. तरीही परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे वर्ष वाया गेल्याचे दु:ख आहे. 
- माउली करांदे, नीट परीक्षार्थी 

- अशा घटना इतरांच्या बाबतीत घडू नयेत, यासाठी आपल्या सूचना पाठवा.. फेसबुक आणि ट्विटरवर
- #NeetSuggestions हॅशटॅग वापरून ट्विट करा
- webeditor@esakal.com वर ई-मेल करा

Web Title: NEET aspirant not allowed for Exam in pune

व्हिडीओ गॅलरी