

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.२२ ः ‘नीट’ परीक्षेसाठी काही मिनिटे केंद्रावर उशीरा पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश का नाकारला गेला?, अशी विचारणा कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी आज जंतरमंतरवर केली.
एकीकडे किरकोळ कारणासाठी विद्यार्थ्यांना शिक्षा दिली जात आहे तर दुसरीकडे प्रश्नपत्रिकाफुटीसाठी जबाबदार असलेल्या लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करणे सरकार टाळत आहे, असा आरोप त्यांनी केला. प्रश्नपत्रिकाफुटीची जबाबदारी निश्चित करत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा, अशा मागणीसाठी ‘ सीजेपी’कडून मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनात भाग घेण्यासाठी जंतरमंतरवर येणाऱ्या लोकांकडून पोलिस आधारकार्ड व पॅनकार्ड मागत असल्याचा आरोपही दीपके यांनी केला. या मुद्द्यावरुन त्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमक झाली.
जनतेच्या अधिकारासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत, त्यामुळे विनाकारण लोकांना त्रास दिला जाऊ नये. एखाद्या व्यक्तीचे आधारकार्ड घेत त्याची वैयक्तिक माहिती जमा केली जाऊ शकते. लोकांच्या खासगी आयुष्यात डोकाविण्याचा हा प्रयत्न असल्याचे दीपके यांनी सांगितले. मात्र, आधारकार्ड मागितल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळून लावला आहे.
आंदोलकांच्या खानपानाची व्यवस्था
भारतीय किसान युनियनने (चढूनी गट) या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्यांसाठी चहा, पाणी आणि सामोसे देण्याची व्यवस्था स्वयंस्फूर्तीने काही लोक करीत होते. पोलिसांनी ‘सीजेपी’ला आंदोलनासाठी केवळ एका दिवसासाठी परवानगी दिली होती. मात्र मागण्या मान्य होईपर्यंत जंतरमंतर सोडण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे. आंदोलनात युवक मोठ्या संख्येने सामील झाले आहेत. प्रश्नपत्रिकाफुटीच्या घटनेनंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यांना आंदोलनस्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.