घरफोड्या करणारी नेपाळी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पाच गुन्हे उघडकीस; सुमारे 23 लाखांचे सोन्या- चांदीचे दागिने जप्त
पुणे - सोसायटीमध्ये वॉचमन म्हणून काम करीत रात्री घरफोड्या करणाऱ्या नेपाळी टोळीतील सहा जणांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आणत सुमारे 23 लाखांचे सोन्या- चांदीचे दागिने जप्त केल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी दिली.

दीपक ऊर्फ गुरू रंगनाथ जोशी (वय 33, रा. नालासोपारा, जि. पालघर), सागर देवराज खाती (33, रा. कामगारनगर, पिंपरी), पद्‌मबहादूर लच्छीबहादूर शाही (43, रा. खांडेवस्ती, भोसरी), जगत कालू शाही (35, रा. कस्पटे वस्ती, मानकर चौक, वाकड), जनक गोरख शाही (40, रा. मल्हारनगर गल्ली, काळेवाडी), गगन ऊर्फ काल्या कोपूरे (27, रा. शिवनेरी पार्क, बालेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

हे सर्व जण मूळ नेपाळ येथील रहिवासी असून, चतु:शृंगी परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वॉचमन म्हणून कामाला होते. त्यापैकी गगन कोपूरे हा बंद घरांची रेकी करून साथीदारांना माहिती पुरवीत होता. ते कामास असलेल्या सोसायटीपासून काही अंतरावरील फ्लॅटमध्ये रात्री कोणी नसल्याची खात्री करीत असत. त्यानंतर त्या फ्लॅटचा दरवाजा उचकटून दागिन्यांची चोरी करीत असत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तब्बल 646 ग्रॅम सोन्याचे दागिने, सहा किलो चांदीची भांडी आणि हत्यारे जप्त केली आहेत. चोरीचा ऐवज खरेदी करणाऱ्या निरापद सुदर्शन दास आणि एकेंद्र प्रसाद नाथ (रा. नालासोपारा, जि. पालघर) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

आरोपी बाणेर रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी प्रवीण पाटील यांना मिळाली. त्यावरून अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त शशिकांत शिंदे, उपायुक्‍त गणेश शिंदे, सहायक आयुक्‍त वैशाली जाधव- माने, वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उदय शिंगाडे यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक संदेश केंजळे, प्रमोद क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: nepali gang arrested