"नेट'च्या परीक्षार्थींना मनस्ताप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

पुणे - राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (नेट) तिकिटावर परीक्षा केंद्राचा चुकीचा क्रमांक, अपुरा पत्ता यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना रविवारी या परीक्षेला मुकावे लागले असून मनस्ताप सहन करावा लागला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) चुकांमुळे भवितव्य धोक्‍यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया परीक्षार्थींनी व्यक्त केली आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने "सीबीएसई'कडे बोट दाखवत हात झटकले आहेत. 

पुणे - राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (नेट) तिकिटावर परीक्षा केंद्राचा चुकीचा क्रमांक, अपुरा पत्ता यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना रविवारी या परीक्षेला मुकावे लागले असून मनस्ताप सहन करावा लागला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) चुकांमुळे भवितव्य धोक्‍यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया परीक्षार्थींनी व्यक्त केली आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने "सीबीएसई'कडे बोट दाखवत हात झटकले आहेत. 

आयोगातर्फे वरिष्ठ महाविद्यालये अथवा विद्यापीठांमधील व्याख्याता पदासाठी ही परीक्षा घेण्यात येते. शहरात लुल्लानगर, रेसकोर्स, दिघी, विश्रांतवाडी, नऱ्हे, सिंहगड रस्ता येथील अनेक केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता परीक्षा सुरू होणार होती. परीक्षा सुरू होण्याआधी तासभर आधी हॉल तिकिटावर दिलेल्या पत्त्यावर पोचल्यावर काही परीक्षार्थींना संबंधित केंद्रावर त्यांचा नंबर नसल्याचे सांगण्यात आले. हॉल तिकिटावर केंद्राच्या चुकलेल्या क्रमांकामुळे एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागली. परीक्षेचा ताण घेत विद्यार्थ्यांना या गोंधळाचा सामना करावा लागल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दुसऱ्या परीक्षा केंद्रावर वेळेवर पोचू न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकले. 

लुल्लानगर येथील केंद्रावरील किमान 50 परीक्षार्थींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर लुल्लानगरचा पत्ता होता; मात्र केंद्र क्रमांक चुकीचा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. केंद्रीय विद्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलविले. मात्र, यावर त्वरित मार्ग न निघाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. परीक्षा केंद्रावर पोचायला दोन-तीन मिनिटे उशीर झालेल्या काही परीक्षार्थींनाही परीक्षेला बसू दिले नसल्याची तक्रार करण्यात आली. 

कुलदीप देशमुख हा परीक्षार्थी हॉल तिकिटावरील नोंदीनुसार लुल्लानगरच्या केंद्रावर गेला. तेथून त्याला रेसकोर्सला पाठविण्यात आले. यानंतर दिघी आणि विश्रांतवाडीला तो गेला. अखेर त्याचे परीक्षा केंद्र नऱ्हे येथील महाविद्यालयात असल्याचे स्पष्ट झाले. मात्र तेथे पोचेपर्यंत परीक्षा सुरू झाली होती. जळगावहून आलेल्या एका अपंग विद्यार्थ्यासही परीक्षेस मुकावे लागले. 

आयोगाने झटकले हात 
परीक्षेतील या गोंधळाबद्दल तुम्ही केंद्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) विचारा. मंडळाच्या अधिकाऱ्यांशी तुम्ही का बोलत नाहीत, त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोला, असे सांगत विद्यापीठ अनुदान आयोगाचे दिल्लीतील सहसंचालक सुरिंदर सिंग यांनी हात झटकले. सीबीएसईच्या अधिकृत अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक मागितला असता, त्यास त्यांनी नकार दिला. 

परीक्षार्थींचे अनुभव : 
हॉल तिकिटावर पाषाण येथील परीक्षा केंद्राचा पत्ता होता. ते केंद्र मी आदल्या दिवशीच पाहिले होते. त्यानंतर रविवारी सकाळी केंद्रावर गेल्यावर माझ्या हॉल तिकिटावरील पत्ता चुकल्याचे सांगितले आणि माझ्यासह तिघांना दुसऱ्या केंद्रावर जाण्याची सूचना केली. त्याप्रमाणे आम्ही दुसरे केंद्र शोधू लागलो. भुकूम येथील एका छोट्या विद्यालयात हे केंद्र होते. आम्ही केंद्रावर पोचलो त्या वेळी परीक्षा सुरू होऊन केवळ तीन-चार मिनिटे झाली होती. तरीही आम्हाला परीक्षेला बसू देण्यात आले नाही. 
- सुकेशनी मोरे 

नगरहून पहाटे चार वाजता दुचाकीवरून हॉल तिकिटावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोचलो. परंतु, केंद्रावर गेल्यावर हॉल तिकिटावरील परीक्षा केंद्र चुकल्याचे कळले. त्यानंतर दुसऱ्या केंद्रापर्यंत पोचेपर्यंत परीक्षा सुरू झाली होती. त्यामुळे परीक्षा देता आली नाही. 
- हरिभाऊ आढाव 

परीक्षेसाठी पाच वर्षांची लहान मुलगी घरी ठेवून मी इंदापूरहून पुण्यात आले. परीक्षा केंद्रावर वेळेवर पोचले होते. परंतु, हॉल तिकिटावरील केंद्राचा पत्ता चुकीचा असल्याने मला परीक्षा देता आली नाही. 
- सरिता बनसोडे 

मी निगडीला राहते, माझा नंबर लुल्लानगर येथील विद्यालयात लागला होता. परीक्षा केंद्र मी कालच पाहिले होते. त्या वेळी तेथील अधिकाऱ्यांनीही येथे परीक्षा असल्याचे सांगितले. परंतु आज सकाळी गेल्यावर तुमच्या हॉल तिकिटावरील पत्ता बरोबर आहे; परंतु परीक्षा केंद्राचा नंबर चुकला असल्याचे सांगून; मला परीक्षेला बसू दिले नाही. 
- नंदा पाटोळे 

Web Title: NET candidates face problems despite being on time