नव्या शहराध्यक्षाच्या शोधात राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

पुणे - महापालिका निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर पूर्णवेळ देऊन आठही विधानसभा मतदारसंघांत पक्षसंघटना भक्कम करणाऱ्या आणि विविध समाजघटकांना जोडणाऱ्या उमेदवाराचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी शोध सुरू आहे. भाजपला धारेवर धरू शकणाऱ्या उमेदवाराला विरोधी पक्षनेतेपद द्यावे, असा सूर पक्षात उमटत आहे.

महापालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण यांनी पक्षाकडे राजीनामा सादर केला. आता विरोधी पक्षनेतेपदही पक्षाकडे येणार असल्याने त्यासाठीचा उमेदवार निश्‍चित करायचा आहे. शहराध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता या दोन्ही पदांसाठीची निवड एकाच वेळी होईल, अशी शक्‍यता पक्षाकडून वर्तविली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची आठही विधानसभा मतदारसंघांत ताकद आहे; परंतु लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतील पराभवामुळे पक्षसंघटना विस्कळित झाली आहे. दलित, मुस्लिम, ख्रिश्‍चन आदी समाजघटकांबरोबरच ब्राह्मण, जैन, माहेश्‍वरी आदी अल्पसंख्याक समाजाला पक्षाशी जोडणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीची ताकद उपनगरांत अधिक आहे; परंतु गेल्या काही वर्षांत उपनगरांत वास्तव्य करणारे बहुतेक नागरिक हे अन्य राज्ये व शहरांतून स्थलांतरित झालेले आहेत. त्यामुळे बहुभाषिक मतदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पक्षसंघटना भक्कम करताना बदलत असलेल्या आणि दुरावलेल्या समाजघटकांपर्यंत जाऊन त्यांना पक्षसंघटनेशी जोडू शकेल, अशा उमेदवाराची अध्यक्षपदासाठी निवड करावी, असा सूर पक्षातून व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांना मूळ प्रवाहात आणू शकेल, असा उमेदवार पक्ष शहराध्यक्षपदासाठी निवडणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदासाठी अनेक नावे चर्चेत असली, तरी महापालिकेच्या कामकाजाचे तपशील माहिती असलेल्या आणि प्रभावी वक्तृत्व असलेल्या उमेदवाराची निवड या पदावर करण्यात यावी, अशी मागणी पक्षात होत आहे.

Web Title: new city president searching by ncp