आजची पिढी होतेय ‘वजनदार’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

पुणे - आजची किशोरवयीन मुले-मुली स्थूल होत असल्याने त्यांचे वजन वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली यामुळे शिक्षणात हुशार आणि तंत्रज्ञानात अव्वल ठरलेली ही पिढी शारीरिक स्वास्थात मात्र पिछाडीवर गेली असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी शोध निबंधांमधून अधोरेखित केले आहे. 

पुणे - आजची किशोरवयीन मुले-मुली स्थूल होत असल्याने त्यांचे वजन वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली यामुळे शिक्षणात हुशार आणि तंत्रज्ञानात अव्वल ठरलेली ही पिढी शारीरिक स्वास्थात मात्र पिछाडीवर गेली असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी शोध निबंधांमधून अधोरेखित केले आहे. 

किशोरवयात असलेली आजची मुले-मुली वेगाने बदलणारे तंत्रज्ञान कुशलतेने आत्मसात करतात. त्यासाठी आवश्‍यक ते प्रशिक्षणही त्यांनी घेतलेले असते. त्यामुळे लवकरच ही मुले स्वतःच्या पायावर आत्मविश्‍वासाने उभे राहतात. अशा मुलांमध्ये स्थूलता वेगाने वाढते. त्यांचे वजन वाढते. त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. तंत्रज्ञानात पुढे जाणारी ही मुले आजारांमध्येही पुढे जात असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. 

लेप्रो ओबेसो सेंटरमध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये तपासलेल्या दहा हजार रुग्णांमध्ये साडेतीन हजार किशोरवयीन रुग्ण आहेत. त्याबाबत रुग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर ही माहिती पुढे आली आहे. 

सर्वेक्षणाचे निष्कर्ष....
पूर्वी मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे वयाच्या ४० ते ४५ वर्षांनंतर निदान होत असे. ते आता तिशीच्या आतमध्ये आले आहे. 
३० पेक्षा कमी वयाच्या १८ टक्के मुला-मुलींना मधुमेहाचे निदान झाले आहे. 
२२ टक्के मुला-मुलींना उच्च रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉल नियंत्रणाची औषधे सुरू करावी लागली आहेत. 

आरोग्यावरील दूरगामी परिणाम
अत्यंत कमी वयात होणाऱ्या या मोठ्या आजारांचा दूरगामी परिणाम शरीरावर होतो. त्यात मुले आणि मुलींवर होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये फरक आहे. 
मुलांमध्ये वयात येताना पोट, कंबर आणि छाती वाढते. 
मुलींमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वेगाने वाढते.
संप्रेरकांच्या बदलांमुळे मुलींच्या चेहऱ्यावर केस वाढतात.
मानसिक आजार वाढण्याचा धोका ७० टक्‍क्‍यांवर पोचला.
 

लठ्ठपणाला सर्वांत गंभीर आजार समजून वेळेवर उपचार करणे आवश्‍यक आहे. कारण ८० टक्के आजारांचे मूळ हे यात असते. त्यातून कमी वयात हृदयविकार, सांध्यांचे प्रत्यारोपण, मणक्‍यांची शस्त्रक्रिया आणि मधुमेहामुळे होणारी गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे किशोरवयातच वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा डोंगर उभा राहण्याची शक्‍यता असते. हे टाळण्यासाठी वेळेतच वजन कमी करा.
- डॉ. शशांक शहा, बॅरीयाट्रिक सर्जन, लेप्रो ओबेसो सेंटर

कशामुळे वाढतोय वजनदारपणा?
शालेय जीवनापासूनच मुलांच्या हातात मोबाईल दिला जातो. त्यामुळे मैदानावर खेळण्याऐवजी एकाच जागेवर तासन्‌तास बसून मोबाईलवरचे खेळ खेळणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे. हीच मुले मोठी झाल्यानंतर नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करतात. पण, शारीरिक व्यायाम करत नाहीत. त्यांचा मैदान, खेळ अन् व्यायामाचा संबंध तुटतो. त्याचा थेट परिणाम वजन वाढण्यावर होतो. 
बदलत्या जीवनशैलीत खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. पिझ्झा, बर्गर याबरोबरच कोल्डड्रिंक्‍समधून मोठ्या प्रमाणात उष्मांक वाढतो. पण, त्याचा वापर न केल्याने वजन वाढते. 

हे नक्की करा...
नियमित चालण्याचा व्यायाम करा
योग्य आहार ठेवा

Web Title: new generation fat