पुणे शहरासह जिल्ह्याची मंत्रिपदाची पाटी कोरी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात पुणे शहर व जिल्ह्याची मंत्रिपदाची पाटी कोरीच राहिली. नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आज (ता.२८) शपथ घेतलेल्या सात मंत्र्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील एकाचीही वर्णी लागलेली नाही.

पुणे - राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात पुणे शहर व जिल्ह्याची मंत्रिपदाची पाटी कोरीच राहिली. नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आज (ता.२८) शपथ घेतलेल्या सात मंत्र्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील एकाचीही वर्णी लागलेली नाही. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांना आता दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहावी लागणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सध्यातरी जिल्ह्यातील आंबेगावचे आमदार व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस), भोरचे आमदार संग्राम थोपटे (काँग्रेस) आदींची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत; परंतु यापैकी किती जणांना संधी मिळेल, हे मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतरच समजू शकणार आहे. 

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचा समावेश असलेल्या ‘महाविकास आघाडी’चे सरकार सत्तेवर आले आहे. या तीन पक्षांपैकी शिवसेनेचा शहर व जिल्ह्यात एकही विधानसभेचा आमदार नाही. मात्र हे तीनही पक्ष आपापल्या पक्षातील किमान एका व्यक्तीला मंत्रिपदाची संधी देतील, अशी चर्चा आहे. मात्र सेनेकडून कोण, याचा अद्यापही उलगडा होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिघांची तीव्र इच्छा आहे. यापैकी अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. दिलीप वळसे पाटील हेही इच्छुक असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्‍वासू मानले जातात. भरणे हे दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आलेले आहेत. शिवाय धनगर समाजातील ते राज्यातील एकमेव आमदार आहेत. त्यामुळे या समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, असा एक मतप्रवाह पुढे आला आहे. काँग्रेसचे जिल्ह्यात दोनच आमदार आहेत. त्यापैकी पुरंदरचे संजय जगताप हे पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे भोरमधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले संग्राम थोपटे यांच्या नावावर काँग्रेसचे एकमत होऊ शकते. या तीनही पक्षांना जिल्ह्यात आपापली ताकद वाढवायची असल्याने, प्रत्येक पक्षाचा किमान एक मंत्री होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

अजित पवार पालकमंत्री 
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा याच पदासाठी अडून बसल्याची चर्चा आहे. त्यांचा

आजच्या पहिल्या टप्प्यात मंत्री म्हणून शपथविधी होऊ शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री पद मिळेल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. पवार हे उपमुख्यमंत्री झाले तरी, जिल्ह्याचे पालकमंत्रीही तेच असणार आहेत. परिणामी पाच वर्षांच्या खंडानंतर पवार पुन्हा एकदा पालकमंत्री होण्याची चिन्हे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Government Minister of the district with the city of Pune