नवीन कात्रज बोगद्यात रस्ता निसरडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

खेड शिवापूर - पावसाचे पाणी झिरपून कात्रज नवीन बोगद्यातील संपूर्ण रस्ता निसरडा झाला आहे. या निसरड्या रस्त्यावर दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात बोगद्यात निर्माण होणाऱ्या धोकादायक परिस्थितीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा दुर्लक्ष करत आहेत. 

कात्रज नवीन बोगद्यात दरवर्षी पावसाचे पाणी झिरपून रस्ता निसरडा होतो. विशेषतः बोगद्यातील पुणे-सातारा लेनवर अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे उपळे फुटले आहेत. त्यातून वाहणाऱ्या पाण्याने बोगद्यातील सर्व रस्ता निसरडा झाला आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूला तर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे येथून जाताना या पाण्याचा अंदाज न आल्याने या रस्त्यावर दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात बोगद्यात झिरपणाऱ्या या पावसाच्या पाण्याने अपघात होतात. असे असताना या धोकादायक परिस्थितीकडे रिलायन्स इन्फ्रा दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या या दुर्लक्षामुळे या ठिकाणी अपघात होऊन एखाद्याचा जीव जाण्याची भीती प्रवासी व्यक्त करत आहेत. 

बोगद्यात या पाण्याचा अंदाज येत नसल्याने येथून जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असल्याचे प्रवासी योगेश मोने यांनी सांगितले.

कात्रज नवीन बोगद्यात झिरपणाऱ्या पावसाच्या पाण्याची पाहणी करण्यात येईल. तसेच याबाबत आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यासाठी रिलायन्स इन्फ्रा कंपनीला ताबडतोब सूचना देण्यात येईल.
- मिलिंद वाबळे, व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Web Title: New Katraj Tunner road Slippery