खेळता खेळता गणित 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पुणे - अभ्यास म्हटले की लहान मुलांच्या कपाळावर आठ्या पडतात, त्यात गणिताचा अभ्यास म्हटले की त्यांची डोकेदुखी सुरू होते; पण खेळायचे म्हटले की मुलांचा चेहरा आनंदाने खुलतो. पण, खेळता- खेळता नकळत गणित विषयाचा अभ्यास करायला मिळाला तर, धम्मालच ना!! असाच एक प्रयोग शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेने केला आहे. खेळता-खेळता विद्यार्थ्यांना गणितासारखा किचकट, अवघड वाटणारा विषय सोपा वाटावा, म्हणून या शाळेने गणित प्रयोगशाळा सुरू केली आहे. 

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमात असणाऱ्या गणित विषयावर आधारित ही प्रयोगशाळा नव्याने उभारण्यात आली आहे. प्रयोगशाळेचे नुकतेच उद्‌घाटनही करण्यात आले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात असलेल्या गणितीय संकल्पना खेळाच्या माध्यमातून समजून घेता याव्यात, यासाठी ही प्रयोगशाळा आहे. एरवी विद्यार्थ्यांना गणिते सोडवायला सांगितले, की त्यांच्या कपाळाला आठ्या पडतात; पण खेळांतून अवघ्या काही मिनिटांत दहा ते पंधरा गणिते विद्यार्थी सहज सोडवू शकतात, असा अनुभव शाळेतील शिक्षकांनी सांगितला. प्रयोगशाळेत बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार, अंतर व वजन मोजणे, अशा गणितातील किचकट संकल्पना विद्यार्थ्यांना खेळातून शिकायला मिळणार आहेत. 

प्रयोगशाळेच्या उभारणीत पालकांसह माजी विद्यार्थ्यांचा सहभाग 
शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचा वाढदिवस असल्यास चॉकलेट्‌स, अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. परंतु शाळेला शैक्षणिक साहित्य देऊन मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही पालक स्वत:हून पुढे आले. या पालकांसह माजी विद्यार्थ्यांनी न्यू इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या माध्यमातून प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी आवश्‍यक असणारे शैक्षणिक साहित्य देऊ केले. त्यातूनच ही प्रयोगशाळा उभी राहिली, असे शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी सांगितले. 

खेळातून गणितातील क्‍लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी प्रयोगशाळेची उभारणी केली आहे. मूल्यमापन या संकल्पनेवर आधारित ही प्रयोगशाळा आहे. शहरातील अन्य शाळेतील विद्यार्थी आणि अन्य पालकही आपल्या मुलांना घेऊन प्रयोगशाळेत येऊ शकतात, त्यासाठी संबंधितांनी शाळेशी संपर्क साधावा. 
- कल्पना वाघ, मुख्याध्यापिका, नवीन मराठी शाळा 

दोन गावांतील अंतर कसे मोजतात, उंची कशी मोजतात, वजन कसे केले जाते, दुधाचे प्रमाण कसे मोजता येते, अशा गणितातील विविध संकल्पना या प्रयोगशाळेत सोप्या पद्धतीने शिकायला मिळत आहेत. खेळातून गणित शिकायला मिळत आहे. 
- स्वानंदी काळे, विद्यार्थिनी, इयत्ता चौथी

Web Title: New Marathi School Program for mathematics