‘सवाल आपल्या भावाच्या प्रतिष्ठेचा हाय!’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नवी सांगवी - महाविद्यालयीन तरुणांकरिता महत्त्वाकांक्षी ठरलेल्या ‘सकाळ’च्या ‘यिन’ या उपक्रमांर्तगत आज बाबूरावजी घोलप महाविद्यालयात निवडणूक उत्साहात झाली. सकाळी अकरा वाजता ऑनलाइन मतदानाला सुरवात झाली. सकाळी दहा वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी मतदान केंद्राच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. असे असले तरी कोठेही गडबड,गोंधळ दिसत नव्हता.

नवी सांगवी - महाविद्यालयीन तरुणांकरिता महत्त्वाकांक्षी ठरलेल्या ‘सकाळ’च्या ‘यिन’ या उपक्रमांर्तगत आज बाबूरावजी घोलप महाविद्यालयात निवडणूक उत्साहात झाली. सकाळी अकरा वाजता ऑनलाइन मतदानाला सुरवात झाली. सकाळी दहा वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी मतदान केंद्राच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. असे असले तरी कोठेही गडबड,गोंधळ दिसत नव्हता.

उलट लांबच्या लांब रांग करून मतदारांनी आपल्या शिस्तीचे दर्शन घडविले.
या वेळी चार उमेदवार रिंगणात होते. शेवटच्या दोन दिवसांत वर्गावर्गांत तसेच महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांना भेटून त्यांनी आपला प्रचार केला. कुठेही राजकीय वारसा लाभलेला किंवा पार्श्‍वभूमी नसलेले विद्यार्थी उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. मतदार विद्यार्थ्यांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे चित्र पाहायला मिळत होते.  या वेळी पंधराशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मतदानाचा अधिकार बजाविला. विद्यालयाचे प्राचार्य डॉ. लतेश निकम व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चंदा हासे या निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून होत्या.

सर्व ठिकाणी ऑनलाइन मतदान प्रक्रिया राबविण्याचा केंद्र शासनाचा प्रयास आहे; परंतु ‘सकाळ’ने याची सुरवात करून आदर्श निर्माण केला आहे. मोठी यंत्रणा व पैशाचा विनियोग सध्याच्या निवडणूक प्रक्रियेचा भाग झाला आहे. या सर्वाला यातून चाप बसणार आहे. विद्यापीठाकडून मेरिटच्या आधारे निवडणूक घेतली जात होती. ती प्रक्रिया इलेक्‍शन नसून सिलेक्‍शन होती; परंतु या प्रक्रियेमुळे लोकशासनाचा दर्जा उंचावून चांगल्या लोकांच्या हाती नेतृत्व जाणार आहे. 
- डॉ. लतेश निकम, प्राचार्य   

‘सकाळ यिन’चा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. महाविद्यालयात शांत पद्धतीने निवडणूक झाल्याने आदर्श निर्माण झाला आहे. ऑनलाइन पद्धतीचा निवडणुकीत वापर झाल्याने विद्यार्थ्यांना या पद्धतीच्या वापराची माहिती असल्याने अडचण आली नाही. 
- डॉ. स्नेहल अग्निहोत्री, प्राचार्य  

उमेदवार म्हणतात...

रवींद्र मोरे (एस. वाय. बीएस्सी) -
निवडणुकीच्या माध्यमातून राजकारण व समाजकारणाच्या नावाखाली सर्व काही खरेखोटे झाकून जाते. हा आजवर आपला समज झाला आहे. मी तसे काही न करता माझ्या दुर्गसंवर्धन या उपक्रमातून माझ्या महाविद्यालयाचे नाव एका उंचीवर नेऊन ठेवणार आहे. 

प्रियांका बनसोडे (एस. वाय. बीए) -
मी आता नुकतेच माझे अठरा वर्षे वय पूर्ण केले आहे. ‘सकाळ’द्वारे यिन हे चांगले व्यासपीठ आम्हासाठी उपलब्ध झाले आहे. यामुळे मुलींनादेखील मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यानिमित्ताने माझा नवनवीन मित्रमैत्रणींशी परिचय झाला.

आकाश शिर्के (एस. वाय. बीसीएस) -
सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन काम करण्याची संधी यातून मिळत आहे. ऑनलाइन मतदानामुळे बोगस अथवा मतपत्रिकेचा घोळ या गोष्टी घडणार नाहीत. ‘सकाळ’ने हा उपक्रम राबवून खरोखर मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे.

रोहित वाघमारे (टी. वाय. बीकॉम) -
यंदा २०१७ ला मनपा निवडणुकीत पहिल्यांदाच मला मतदानाचा अधिकार मिळाल्याने मी मतदान केले; परंतु ‘सकाळ’च्या माध्यमातून मला उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची संधी उपलब्ध झाली. याचा फायदा निश्‍चितच पुढील जीवनात होईल.
 

राजदीप तापकीर (एफवाय बी. कॉम.) -

प्रथमच विद्यार्थी निवडणुकीत उभा राहिलो असून, त्यामुळे वेगळाच अनुभव येत आहे. तसेच विजय माझाच होणार आहे, याचा मला ठाम विश्वास आहे. 

जशन अन्सारी (एफवाय बी. कॉम.) -

‘सकाळ यिन’ निवडणुकीचा अनुभव चांगला होता. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद होता. मला माझा विजय होईल असा आत्मविश्‍वास आहे.

‘ डी. वाय.’मध्ये उत्साह
पिंपरी - पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील आर्ट, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयामध्ये झालेल्या निवडणुकीत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदानाचा हक्‍क बजावला.  निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजदीप तापकीर व जशन अन्सारी या दोन उमेदवारांचे भविष्य मतदानपेटीत बंद झाले आहे. या प्रसंगी प्राचार्य डॉ. स्नेहल अग्निहोत्री, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रतिमा चव्हाण, डॉ. मानसी कुर्तकोटी, मालिनी नायर, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर उपस्थित होते.

आपल्या तासिका आटोपून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मतदानासाठी धाव घेत, मतदानाचा हक्‍क बजावला. महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रतिमा चव्हाण, डॉ. मानसी कुर्तकोटी, मालिनी नायर यांनी काम पाहिले. 

कुठलाही अनुचित प्रकार न घडता निवडणूक प्रक्रिया झाली. विद्यार्थ्यांनी प्रचारात कुठेही भित्तिपत्रके, फ्लेक्‍सचा वापर न करता मौखिक प्रचार केला. ‘यिन’च्या माध्यमातून उद्या हेच युवक देशाच्या, राज्याच्या मंत्रिमंडळात जाऊन आदर्श व स्वच्छ कारभार करतील.
- डॉ. चंदा हासे, निवडणूक निर्णय अधिकारी   

निवडणुकीचा अनुभव चांगला होता. ‘सकाळ-यिन’च्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला एक प्रकारची दिशा मिळाली आहे. 
- डॉ. मानसी कुर्तकोटी, निवडणूक निर्णय अधिकारी 

‘यिन’मुळे विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवायला मदत होईल. तसेच स्वतःच्या व्यक्‍तिमत्त्व विकासासाठीदेखील हा उपक्रम उपयुक्‍त ठरणार आहे. 
- मालिनी नायर, निवडणूक निर्णय अधिकारी 

ऑनलाइन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया सोईस्कर झाली. तसेच यामुळे वेळेचीदेखील बचत झाली.

- प्रतिमा चव्हाण, विद्यार्थी कल्याण अधिकारी

Web Title: new sangavi pimpri news yin election