नवमतदारच ठरविणार उमेदवाराचे भवितव्य 

संदीप घिसे
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

पिंपरी - निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष नोंदणीत शहरात एक लाख 26 हजार नवमतदारांची नोंद झाली. शहरातील 32 प्रभागांमध्ये सरासरी चार हजार नवमतदारांची नोंद झाली आहे. हेच नवमतदार आगामी महापालिकेच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराचे भवितव्य ठरविणार आहेत. 

पिंपरी - निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष नोंदणीत शहरात एक लाख 26 हजार नवमतदारांची नोंद झाली. शहरातील 32 प्रभागांमध्ये सरासरी चार हजार नवमतदारांची नोंद झाली आहे. हेच नवमतदार आगामी महापालिकेच्या निवडणुकीत विजयी उमेदवाराचे भवितव्य ठरविणार आहेत. 

शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार सतरा लाख आहे. सध्याची लोकसंख्या 20 लाखांच्या आसपास आहे. मतदारांची संख्या 11 लाख आहे. त्यात आणखी सव्वालाख नवमतदारांची नोंद झाली. आगामी निवडणुकीसाठी सव्वाबारा लाख मतदार असणार आहेत. नव्याने केलेल्या 32 प्रभागांच्या रचनेनुसार एका प्रभागात 38 ते 40 हजार मतदार असण्याची शक्‍यता आहे. शिवसेना-भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात युती-आघाडी होवो किंवा न होवो. मात्र, यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असे राजकीय विश्‍लेष्कांना वाटते. गेल्या वर्षी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत चिंचवडमध्ये कॉंग्रेसच्या एका उमेदवाराचा अवघ्या 10-12 मतांनी पराभव झाला होता. यामुळे यंदाच्या निवडणुकीतही एक-एक मत मिळविण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्न असणार आहेत. जो पक्ष मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करतो, त्यांनाच नवमतदार आपले पहिले मतदान करतात, असा आतापर्यंतचा राजकीय पक्षांचा अनुभव आहे. यामुळे जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्ष मोहीम राबवितात. बहुतांश निवडणुकीत साधारणतः 65 टक्‍के इतके मतदान होते. म्हणजेच एका प्रभागातील चार उमेदवार निवडून येण्यासाठी अंदाजे 26 हजार मतदार आपला मतदानाचा हक्‍क बजावतील. ज्या उमेदवाराला 13 हजार मतदान पडेल, तो उमेदवार विजयी होईल. 

आत्तापर्यंतचा मतदानाचा इतिहास पाहिला तर सर्वाधिक मतदान हे झोपडपट्टी भागात होते. त्यानंतर जो पहिल्यांदाच मतदान करणार असतो, अशा नवमतदारांचा उत्साह मोठा असतो. नवमतदार सहसा पहिले मतदान कधीच चुकवित नाही. विजयी उमेदवाराला निवडून येण्यासाठी 13 हजार मते लागणार असतील, तर त्यात प्रभागातील चार हजार नवमतदारांची मते मोठी भूमिका बजावणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांचा डोळा या नवमतदारांवर असणार आहे.

Web Title: New voters hold the fate of the candidates