नववर्षात जिमवाल्यांना ‘अच्छे दिन’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gym

सुदृढ शरीर आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटू लागल्याने गेल्या काही वर्षांत नागरिकांचे जिमला जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

Gym : नववर्षात जिमवाल्यांना ‘अच्छे दिन’!

पुणे - सुदृढ शरीर आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटू लागल्याने गेल्या काही वर्षांत नागरिकांचे जिमला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः नववर्षाच्या संकल्पांमध्ये व्यायामाच्या संकल्पाचा हमखास समावेश असल्याने जानेवारी महिन्यात सर्वच जिममध्ये गर्दी झाल्याचे दिसून येते. यंदाही हा कल कायम असून शहरातील अनेक जिमच्या सदस्यांमध्ये वाढ झाली आहे. प्रथमच जिमला जाणाऱ्यांनी प्रशिक्षकांच्या देखरेखेखालीच व्यायाम करावा, अन्यथा गंभीर दुखापतीचा धोका उद्भवू शकतो, असा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.

तरुणांसह मध्यमवयीनांचाही उत्साह

जिमकडे वळणाऱ्या नागरिकांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असते. मात्र, कोरोनानंतर आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाल्याने मध्यमवयीन नागरिकांची पावलेही जिमकडे वळत आहेत. यामध्ये ३० ते ४० वयोगटाचा प्रामुख्याने समावेश आहे. एरवी जिममध्ये येणाऱ्या स्त्री-पुरुषांचे प्रमाण सरासरी ३०ः७० असे असते. मात्र, नववर्षानिमित्त नोंदणी केलेल्या नागरिकांमध्ये हेच प्रमाण आता ४०ः६० असे दिसते आहे. कोरोनानंतर काही कंपन्यांमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्याने नागरिकांना उशिरापर्यंत काम करावे लागत आहे. त्यांच्यासाठी रात्री उशिरापर्यंत जिम सुरू ठेवण्याचे धोरण काही जिम चालकांनी स्वीकारले आहे.

डिसेंबरपासूनच गर्दी

जिमकडे वळणारे अनेक तरुण समाजमाध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींकडे आदर्श म्हणून पाहत असतात. यंदा यातील काही व्यक्तींनी डिसेंबरपासूनच व्यायामाला सुरुवात करा, म्हणजे नववर्षातील संकल्पात सातत्य राखता येईल, असा सल्ला दिला. त्यामुळे नेहमी जानेवारीत वाढणाऱ्या सदस्यसंख्येत डिसेंबरपासूनच भर पडली. सरासरी सदस्यसंख्येच्या तुलनेत या महिन्यात सुमारे तीस ते पस्तीस टक्के वाढ झाली, असे निरीक्षण ‘फिटरेंजर जिम’चे संचालक डॉ. मनीष पटवर्धन यांनी नोंदवले.

पुण्यातील जिमची सद्यःस्थिती

  • एकूण जिम - ५०० ते ६००

  • सदस्यसंख्या प्रतिजिम - १००० ते १५००

  • प्रवेशशुल्क प्रतिवर्ष - ८००० ते २५००० रुपये

जानेवारी महिन्यात जिमचे सदस्य होण्यासाठी चौकशीचे प्रमाण वाढले. यातील अनेकांनी सदस्यपदही घेतले. गेल्या आठवड्यात वाढलेल्या थंडीमुळे नवोदितांची वर्दळ काहीशी कमी झाली आहे. मात्र, थंडी कमी होताच ते पुन्हा परततील.

- साजिद खान, फिटनेस ट्रेनर

ही घ्या काळजी...

  • उद्देश निश्चित करून त्यानुसार व्यायामाचा आराखडा तयार करा

  • तज्ज्ञ प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करा

  • कोणतेही साधने हाताळण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती जाणून घ्या

  • इतरांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका, आपल्या शरीरासाठी योग्य असणारे व्यायामच करा

  • समाजमाध्यमांवरील व्हिडिओंचे प्रात्यक्षिक करायचा प्रयत्न नको

  • दुखापत झाल्यास दुर्लक्ष करू नका, त्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्या