#milk नव्या वर्षात दूध वितरण कोलमडणार 

गजेंद्र बडे
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे - शहर व जिल्ह्यातील दूध वितरकांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा 15 दिवस पुरेल एवढाच उपलब्ध आहे. नव्या वर्षात मात्र दूध वितरणाची समस्या उग्र रुप धारण करणार आहे. शेतकऱ्यांप्रमाणे वितरकांना कॅनने दुधाची विक्री करणे शक्‍य नसल्याने शहरातील दूध वितरण व्यवस्था कोलमडण्याचा धोका आहे. यामुळे रोज सुमारे 25 कोटी रुपयांची उलाढाल असलेला दूध व्यवसाय संकटात आहे. 

पुणे - शहर व जिल्ह्यातील दूध वितरकांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा 15 दिवस पुरेल एवढाच उपलब्ध आहे. नव्या वर्षात मात्र दूध वितरणाची समस्या उग्र रुप धारण करणार आहे. शेतकऱ्यांप्रमाणे वितरकांना कॅनने दुधाची विक्री करणे शक्‍य नसल्याने शहरातील दूध वितरण व्यवस्था कोलमडण्याचा धोका आहे. यामुळे रोज सुमारे 25 कोटी रुपयांची उलाढाल असलेला दूध व्यवसाय संकटात आहे. 

पुणे जिल्हा सहकारी उत्पादक संघ (कात्रज डेअरी) ग्राहकांना कॅनमधून दूध उपलब्ध करून देण्याच्या मानसिकेतत आहे. पिशव्यांचा साठा संपताच शेतकऱ्यांकडून केली जाणारी दूध खरेदी थांबविण्याचा निर्णय खासगी दूध संघांनी घेतला असल्याचे महासंघाचे अध्यक्ष आणि सोनाई दूध परिवाराचे संस्थापक दशरथ माने यांनी सांगितले. 

राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करत खासगी व सहकारी दूध उत्पादक संघांनी आपापल्या दुधाच्या रिकाम्या पिशव्या पुन्हा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे बंधन घातले आहे. यामुळे पिशव्या निर्मिती करणाऱ्या कारखानदारांनी येत्या 15 डिसेंबरपासून पिशव्यांचे उत्पादनच थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

दिवसात चार कोटींची उलाढाल 
पुणे शहरात रोज सर्व ब्रॅंडेड दूध संस्थांचे दहा लाख लिटर दुधाचे वितरण होते. यामध्ये चितळे, सोनाई, कात्रज, ऊर्जा, गोकूळ, वारणा, कृष्णा, अमूल आदी संघांचा समावेश आहे. यात एकट्या चितळे दुधाचे पाच लाख लिटर वितरण रोज होते. दुधाचा सरासरी प्रति लिटर दर हा 40 रुपये गृहीत धरला तरी रोज एकट्या पुणे शहरात पिशव्यांमधील दुधामधून चार कोटींची उलाढाल होते. 

राज्यात रोज 51 लाखांच्या पिशव्या 
राज्यभरात रोज 50 लाख लिटर दुधाचे वितरण पिशव्यांमधून होते. राज्यभरात रोज 30 टन पिशव्या लागतात. यापैकी एकट्या पुणे शहरात रोज सहा टन पिशव्यांची गरज असते. राज्यभरात रोज 51 लाख रुपये हे फक्त पिशव्यांवर खर्च होतात. तर पुणे शहरात रोज 10 लाख रुपये पिशव्यांवर खर्च होतात. पूर्वीप्रमाणे काचेच्या बाटलीतून दूध विकायचे झाले तर एका बाटलीला दहा रुपये खर्च येईल. त्यामुळे दुधाचे दरही वाढतील. 

...कदाचित मार्ग निघेल 
दिवसभरात विक्री केलेल्या पिशव्या जमा करणे दूध संघांना शक्‍य नाही, ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. येत्या आठवडाभरात संबंधित खात्याच्या प्रधान सचिवांसोबत बैठक होणार आहे. तीत मार्ग निघण्याची आशा आहे. 
- प्रकाश कुतवळ, अध्यक्ष, ऊर्जा दूध प्रकल्प 

प्लॅस्टिक पिशव्यांशिवाय दूध वितरण अशक्‍य आहे. पिशव्या संपल्यानंतर वितरण थांबविण्याशिवाय पर्याय नाही. दुधाची खुली विक्री करणे अवघड आहे. 
- गिरीश चितळे, भागीदार, चितळे दूध प्रकल्प 

Web Title: new year milk distribution will collapse