आळंदीत अतिक्रमण कारवाईचा एक दिवसांचाच देखावा

alandi city
alandi city

आळंदी (पुणे) : आळंदी पालिकेने कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर सुमारे पंधराहून अधिक अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात शुक्रवारी (ता. 15) जमीनदोस्त केली. मात्र, आज मुख्याधिकारी समीर भूमकर कार्यालयात नसल्याने अतिक्रमण कारवाईसाठी नेमलेल्या पथकाने विश्रांती घेतली. 

आळंदीतील अतिक्रमणांवर कारवाई करताना पालिका चौकातील एका माजी नगरसेवकाचे अनेक वर्षांपासूनचे हॉटेल जमीनदोस्त केले. मरकळ रस्त्यावरील पाण्याच्या टाकीखालील शेड बांधकाम आणि देहूफाट्यावरील एका वैद्यकीय व्यावसायिकाचे अनधिकृत शेड बांधकाम जमीनदोस्त केले. एसटी स्थानकाशेजारील टपऱ्या हटविल्या.

या कारवाईमुळे मंदिर आणि परिसरातील दुकानदारांनी धसका घेतला. मंदिर परिसरातील व्यावसायिकांनी स्वतःहून अनधिकृत आणि अतिक्रमण केलेली दुकाने मागे हटविली. तरीही, राजकीय आशीर्वादामुळे काही दुकानदार रस्त्यावर ठाण मांडून आहेत. शनी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरही अद्याप दुकानांचे अतिक्रमण काढलेले नाही. 

शहरात मागील वर्षभरात अनेकांनी अनधिकत पत्राशेड मारून गाळे बांधले. मात्र, प्रशासनाने कारवाई केली नाही. शुक्रवारची कारवाई करताना पालिका चौकातून सुरुवात केली. मात्र, पालिका चौकातच अन्यत्र हातगाड्या आणि अनधिकृत पत्राशेड मात्र प्रशासनाने हटविले नाही. त्यामुळे कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

दरम्यान, आज मुख्याधिकारी भूमकर हे प्रशासकीय बैठकीसाठी पुण्यात गेल्यामुळे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी नेमलेल्या पथकाने विश्रांती घेतली. त्यातील काही कर्मचारी यात्रेसाठी पालिकेकडून देण्यात येणाऱ्या जागांच्या लिलावासाठी अडकले. मात्र, त्यामुळे कारवाई मात्र थंड झाली की काय? अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. 

पदाधिकाऱ्यांना अभय 
पालिकेच्या अनेक ठिकाणी मोक्‍याच्या जागा असून, त्यावर राजकीय पदाधिकाऱ्यांनीच अतिक्रमण केले आहे. यात नगरसेवकही मागे नाहीत. पालिकेच्या जागेत अनधिकृत आणि अतिक्रमण करून बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयाचे निकाल लागूनही पालिकेने जागा खाली करून घेतल्या नाहीत, याचेच आश्‍चर्य सर्वसामान्य नागरिकांना आहे. काहींनी नियम धाब्यावर बसवून पूरनियंत्रण रेषेतच बांधकामे केली. तरीही, बांधकाम विभाग यावर कोणतीच कारवाई करीत नसल्याचे चित्र आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com