Pune Crime : ‘एनआयए’कडून दहशतवादी वास्तव्यास असलेली कोंढव्यातील इमारत जप्त

पुणे ‘इसिस’ मॉड्यूलशी संबंधित दहशतवाद्यांनी कोंढव्यात बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात स्पष्ट झाले आहे.
NIA
NIAesakal

पुणे - पुणे ‘इसिस’ मॉड्यूलशी संबंधित दहशतवाद्यांनी कोंढव्यात बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर ‘एनआयए’ने दहशतवादी वास्तव्यास असलेली कोंढव्यातील मिठानगर येथील ती इमारत जप्त केली आहे. या दहशतवाद्यांनी मुंबई, पुणे शहरासह गुजरात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचला होता.

पुणे पोलिसांनी मागील जुलै महिन्यात कोथरूड परिसरात दुचाकी चोरीच्या संशयावरून महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान , महम्मद युनूस महम्मद याकूब (मूळ रा. मध्यप्रदेश) आणि महम्मद आलम या तिघांना अटक केली होती. ते सर्वजण कोंढव्यातील मिठानगरमध्ये वास्तव्यास होते. त्यांना कोंढव्यात घेऊन जात असताना महम्मद आलम पसार झाला होता. परंतु दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन नोव्हेंबर रोजी आलमला अटक केली होती.

दरम्यान, पुणे पोलिसांनी कोंढव्यातील इमारतीची झडती घेतल्यानंतर बॉम्ब तयार करण्याचे साहित्य, जिवंत काडतुसे आणि ‘इसिस’शी संबंधित आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली होती. या गुन्ह्याचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्यात आला होता. या प्रकरणी ‘एनआयए’ने महम्मद शहानवाझ आलम, रिझवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान, महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (दोघे रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगीर पठाण ऊर्फ अब्दुल कादीर, समीब नसिरुद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), झुल्फिकार अली बडोदवाला ऊर्फ लालाभाई, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (तिघे रा. पडघा, ठाणे) यांना अटक केली होती.

तपासादरम्यान, दहशतवाद्यांनी कोंढव्यात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलात त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. तसेच, नियंत्रित पद्धतीने बॉम्बस्फोटही घडवून आणले होते. या प्रकरणात आरोपींविरूद्ध मुंबईतील विशेष न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com