ट्रान्स्पोर्टनगरी ठप्प

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

उत्तर प्रदेश, हरियाना, गुजरात या भागांतून दक्षिणेकडे जाणारे मालवाहू ट्रक मुंबई-बंगळूर महामार्गाने जातात. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली परिसरांत निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. पूरस्थिती ओसरल्यानंतरच ती दक्षिणेकडे जाणार आहेत. त्यामुळे असोसिएशनने निगडी येथील ट्रान्स्पोर्टनगरीत त्यांची थांबण्याची व्यवस्था केली आहे.

पिंपरी : पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली परिसरांत आलेल्या पुरामुळे मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाहतूक चार दिवसांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे दक्षिणेकडे जाणारे सोळाशे ट्रक निगडीमधील ट्रान्स्पोर्टनगरीत अडकून पडले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतरच या वाहनांना कोल्हापूर, बेळगाव, बंगळूरकडे जाता येणार आहे. ट्रकचालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांना दोन वेळेचे जेवण आणि मोफत पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याचे असोसिएशन ऑफ ट्रान्स्पोर्टचे अध्यक्ष अमित धुमाळ यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेश, हरियाना, गुजरात या भागांतून दक्षिणेकडे जाणारे मालवाहू ट्रक मुंबई-बंगळूर महामार्गाने जातात. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली परिसरांत निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. पूरस्थिती ओसरल्यानंतरच ती दक्षिणेकडे जाणार आहेत. त्यामुळे असोसिएशनने निगडी येथील ट्रान्स्पोर्टनगरीत त्यांची थांबण्याची व्यवस्था केली आहे. तसेच या भागातील रस्त्यावर वाहने उभी केली आहेत. रस्त्यालगत थांबलेल्या या वाहनांवर कोणतीही कारवाई करू नये, अशी विनंती असोसिएशनने पोलिसांना केली आहे. 

महामार्गावर रांगा 
कोल्हापुरातील पूरस्थितीमुळे मुंबई-बंगळूर महामार्गावरील ताथवडे परिसरात जड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कोल्हापूर, सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांना साताऱ्यापर्यंत जाता येत असल्याने ती थांबत-थांबत जात आहेत. 

मार्गात बदल 
बंगळूर, बेळगाव याबरोबरच दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाण्यासाठी वाहनचालकांनी आपल्या नेहमीच्या मार्गात बदल केला आहे. ती सोलापूर, दावणगिरीमार्गे जात आहेत. पूर कधी ओसरेल हे सांगता येत नसल्याने थांबण्यापेक्षा पर्यायी मार्ग अनेकांनी निवडला असून, त्यांना पोचण्यास थोडा उशीर होत आहे. 

ट्रकचालक म्हणतात... 
केशव आडसुळे : मी चार दिवसांपूर्वी मुंबईला जाण्यासाठी वाठारहून दुधाचा टॅंकर घेऊन निघालो होतो. त्या वेळी पूरस्थिती इतकी गंभीर होईल याची कल्पना नव्हती. आता पूर ओसरायला लागल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत या ठिकाणची रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत होतील. 

महेंद्रकुमार : आम्ही गुजरातहून बंगळूरकडे मशिनरी पोचविण्यासाठी निघालो आहोत. मात्र कोल्हापुरातील पूरस्थितीमुळे चार दिवसांपासून महामार्ग बंद आहे. त्यामुळे आम्हाला इथेच अडकून पडावे लागले आहे. अन्य वाहने पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत. मात्र खर्च आणि वेळ याचा विचार करता आम्ही ते टाळले. 

उमेश : पाच दिवसांपूर्वी ट्रक घेऊन दक्षिणेकडे जाण्यासाठी गुजरातहून निघालो होतो. या आठवड्यात माल पोचवून घरच्या कार्यक्रमासाठी चार दिवस सुटीवर जाणार होतो. मात्र पूरस्थितीमुळे आता सुटीवर जाणे अवघड झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nigadi transport nagari