नीला भागवतांचा जीवनप्रवास उलगडणार

संतोष शाळिग्राम 
रविवार, 21 एप्रिल 2019

शास्त्रीय संगीताची जोपासना
माहितीपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शिका सावनी अर्जुन म्हणाल्या, ‘शास्त्रीय संगीतामध्ये चौकटीबाहेर विचार केला जात नाही. परंतु, नीला भागवत त्याला अपवाद आहेत. त्यांनी चौकटीच्या बाहेरचा विचार मांडत शास्रीय संगीताची जोपासना केली, असंख्य प्रयोग केले. यातूनच त्यांना माहितीपट करण्याची प्रेरणा मिळाली.’

पुणे - शास्त्रीय संगीतात वैविध्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या सर्जनशील गायिका नीला भागवत यांचा जीवनप्रवास दृक्‌श्राव्य माध्यमातून उलगडणार आहे.

संत तुकाराम, महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्या रचनांवर बंदिशी बांधण्याचा प्रयोग त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या माहितीपटाच्या निर्मिती, दिग्दर्शनापासून सर्व तांत्रिक प्रक्रिया महिलांनीच पूर्ण केल्या आहेत.

ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल गायनशैलीची परंपरा जोपासत भागवत यांनी या पारंपरिक संगीताच्या सौंदर्यविषयक तत्त्वांचे पोषण केले. एक वैशिष्ट्यपूर्ण कलाकार म्हणून त्यांनी कबीर, शाजो आणि मीरा यांसारख्या मध्ययुगीन संतकवींच्या रचना शास्त्रीय संगीताच्या बाजामध्ये सादर केल्या. त्यांच्या अशा नवकल्पनांमुळे भारत, युरोप तसेच पाकिस्तानमध्ये त्यांची प्रशंसा केली गेली.भागवत या बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या शास्त्रीय संगीताच्या गायिका आहेतच; परंतु नृत्य, अभिनय आणि लेखन यांसारख्या क्षेत्रातही त्या कार्यरत आहेत. त्यांचा ‘तिहाई’ हा काव्यसंग्रह तसेच ‘कबीर गाता गाता’ या कबीराच्या निवडक रचनांचे रसग्रहण मांडणारे पुस्तक व पंडित शरदचंद्र अरोलकर यांचे चरित्रलेखन प्रकाशित झालेले आहे.

संत मीरा, संत सोयराबाई, संत बहिणाबाई, संत चोखामेळा, संत कबीर, संत तुकाराम, यांसारख्या अनेक संतांच्या भक्तिरसातील रचनांना त्यांनी शास्त्रीय संगीताच्या रागांमध्ये स्वरबद्ध केलेले आहे. तसेच इब्राहिम आदिल शाह (दुसरा), महात्मा फुले, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांच्याही बंदिशी बांधल्या आहेत. हा सर्व प्रवास सतरा मिनिटांच्या या माहितीपटात दिसणार असून, रविवारी (ता. २१) निवारा वृद्धाश्रमासमोरील प्रभू ज्ञान मंदिर सभागृहात त्याचे प्रदर्शन होणार आहे. त्यास नीला भागवत उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Nila Bhagwat Life Journey