'ऑगस्ट क्रांती दिनी' होणार 'इंडिया अगेन्स्ट हेट्रेड' चळवळ; काय आहे हे प्रकरण?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

देशात विविध जाती, धर्म आणि वेगेवेगळ्या विचारांची लोकं आहेत. देशाच्या विविधतेला आणि सामजिक एकतेला समाज माध्यमातून धोका पोहोचविण्याचे कार्य गेल्या काही काळापासून सुरू असून ते अतिशय धोकादायक आहे.

पुणे : ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने 'इंडिया अगेन्स्ट हेट्रेड' या संघटनेतर्फे भारताची द्वेषा विरूद्ध लढाईची चळवळ ९ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. द्वेष हा भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमिकतेला सर्वात मोठा धोका असल्याने ही चळवळ करण्यात येणार असल्याची माहिती 'इंडिया अगेन्स्ट हेट्रेड'चे राष्ट्रीय संयोजक, चित्रपट निर्माते आणि सामजिक कार्यकर्ते निलेश नवलाखा यांनी पत्रकाद्वारे दिली.

सनदी लेखापालांसाठी दिलासादायक बातमी; कोरोना उपचारासाठी मिळणार आर्थिक मदत!​

ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत आणि माजी पोलिस महासंचालक जे. एफ. रिबेरो या चळवळीला मार्गदर्शन करणार आहेत. देशात विविध जाती, धर्म आणि वेगेवेगळ्या विचारांची लोकं आहेत. देशाच्या विविधतेला आणि सामजिक एकतेला समाज माध्यमातून धोका पोहोचविण्याचे कार्य गेल्या काही काळापासून सुरू असून ते अतिशय धोकादायक आहे. यावर तातडीने काही उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्यामुळेच संघटनेने ९ ऑगस्टपासून जन आंदोलन करण्याचे ठरविले आहे.

डिप्लोमाला अॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो; ही महत्त्वाची बातमी नक्की वाचा!​

देशातील शांतता आणि सौहार्द टिकवण्यासाठी संघटना चित्रपट, संगीत आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचेसुद्धा आयोजन करणार आहे. यासाठी विविध क्षेत्रातील लोकांचे गट तयार करण्यात येणार आहेत. ही चळवळ प्रथम महाराष्ट्रात आणि नंतर संपूर्ण देशात केली जाणार आहे. या चळवळीमध्ये देशभरातून एक लाख शांती सैनिक नोंदविले जातील, अशी माहिती नवलाखा यांनी दिली आहे. 

तर 'सरहद' ही पुण्यातील काश्मीर, पंजाब आणि सीमा भागात गेली तीस वर्षे काम करणारी संस्था या सगळ्या चळवळीतील कार्यकर्त्यांना संस्थेच्या गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनीच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nilesh Navlakha informed that a new movement will be started by India Against Hatred on the occasion of August Revolution Day