निर्मला सितारमण यांचा महाविकास आघाडीवर हल्ला

वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने टीका करणाऱ्यांनी मोठे प्रकल्प रोखल्याचे उत्तर द्यावे
Nirmala Sitharaman criticism on Mahavikas Aghadi
Nirmala Sitharaman criticism on Mahavikas Aghadi

पुणे : वेदांता फॉक्सकॉन हा एक प्रकल्प गुजरातला गेला म्हणून जे लोक रडत आहेत, त्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प, सागरमाला प्रकल्प, मुंबई मेट्रो, बुलेट ट्रेनचा असे मोठे चार प्रकल्प केवळ मोदींना श्रेय नको म्हणून अडवून ठेवले आहेत. त्यामुळे वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने टीका करणाऱ्यांनी मोठे प्रकल्प रोखल्याने याचे उत्तर द्यावे, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला.

बारामती लोकसभा मतदारसंघाचा तीन दिवसीय दौरा केल्यानंतर निर्मला सितारमण यांनी विधान भवन येथे आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, राहुल कुल, माजी मंत्री बाळा भेगडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी यावेळी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील उद्योगांबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. पण आशिया खंडातील सर्वात मोठी नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला आडवणारे कोण आहेत? पालघर जिल्ह्यात सागरमाला प्रकल्पाअंतर्गत वाढवण पोर्ट हा ६५ हजार कोटीचा प्रकल्प अडवून ठेवला, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष होते. मुंबईसाठी आवश्‍यक असणारा मेट्रो फेज तीन रोखला, त्याचा खर्च ४ हजार कोटीने खर्च वाढला. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन झाली तर मोदींना श्रेय जाईल म्हणून रोखली गेली. याबद्दल महाविकास आघाडीने उत्तर द्यावे, अशी टीका सितारमण यांनी केली.

बारामती दौऱ्यात सहकार क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली. केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केल्याने हे लोक खूष आहेत. पण जे लोक सहकार खात्याच्या जोरावर तुम्ही मोठे झाले, ते सहकार मंत्रालय निर्माण करू शकले नाही. मात्र मोदी सरकारने हे काम केले आहे, असा टोलाही सितारमण यांनी लावला.

बारामतीबद्दल राजकीय भाष्य टाळले

बारामती लोकसभा मतदारसंघात मी भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी आलेली आहे. निवडणुकीसाठी आलेली नाही. बारामतीमध्ये भाजपचे संघटन चांगले आहे, आमचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. कोरोनामध्ये भाजपच्याच लोकांनी जास्त मदतकार्य केले हे मला लोकांनी सांगितले. मी संघटनेबद्दल बोलत आहे, मला संघटनेबाबत कोणतेही प्रश्‍न विचारा, मी निवडणुकीसाठी आलेली नाही, असे सांगत बारामती लोकसभा मतदारसंघातबाबतचे भाष्य करण्याचे सितारमण यांनी टाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com