β पचेल तेवढंच खा...पण खा...

β पचेल तेवढंच खा...पण खा...

पचेल तेवढेच खा...जास्त खाल्ले तर डॉक्‍टरकडं जा‘...या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या सल्ल्याचा एक अर्थ जादा खाऊ नका असा आहे, पण दुसरा खरा अर्थ आहे...खा...खाणं थांबवू नका... 

याला म्हणतात 'पार्टी विथ डिफरन्स‘...इतरांपेक्षा आमचा पक्ष वेगळा आहे, हा भारतीय जनता पक्षाचा दावा खराय...इतर पक्षातील नेते-कार्यकर्ते संधी मिळेल तेव्हा खातात, पण सार्वजनिक जीवनात वावरताना, व्यासपीठावर किंवा मिळेल तिथं आपण शुद्ध कसे आहोत आणि इतरांनीही शुद्ध राहणं कसं चांगलं आहे, ते मानभावीपणानं सांगत राहतात. भाजपचे मंत्री पाहा...त्यांचा कसलाही आडपडदा नाही, बडे शौकसे खाणार आणि खाल्लं तरी ते लपवून ठेवणार नाही. 
 
गडकऱ्यांच्या या बिनधास्तपणाला काय म्हणावं ?... स्वभावाचा सरळपणा, खुली वृत्ती का निर्लज्ज कोडगेपणा ? पसंद अपनीअपनी... 

गडकऱ्यांचं ते बोलणं तोंडानं खायच्या पदार्थांच्या त्यांच्या आवडीबाबत नव्हतं, हे जाणत्यांना कळलंच असेल. त्यांना सुग्रास पदार्थ चापायची दांडगी हौस. पण त्यामुळं वजन (आणि बहुधा कोलेस्ट्रॉलही) वाढलं अन त्यामुळं डॉक्‍टरांनी तेलकट, चमचमीत पदार्थ खायला बंदी घातली. त्यामुळंच 'आपण एकच सामोसा खाऊ शकतो‘, असं त्यांनी पुण्यातल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना पडेल चेहऱ्यानं सांगितलं खरं, पण त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून 'बेतानं खा‘, हा उपदेश केला तो तोंडानं खाण्याबाबतचा नव्हे, हे समजण्याएवढे कार्यकर्ते (अन जनताही) दुधखुळे नव्हेत... 

बरं, या बैठकीत आपल्या मांडीला मांडी, खुर्चीला खुर्ची लावून बसलेल्या नेत्यांच्या उपस्थितीतच गडकऱ्यांनी असली सल्लाबाजी का करावी ? त्यांना कोणावर किंवा कोणाकोणावर निशाणा साधायचा होता ? प्रश्‍ना-प्रश्‍नांचा गलबला अन गुंता खूप आहे. त्यांच्या जवळच बसले होते भोसरी जमीनघोटाळ्यात आरोप झालेले नाथाभाऊ खडसे...कडाडत्या डाळींच्या भावाने वादाच्या भोवऱ्यात गेलेले गिरीश बापट...तिरूपती बालाजी देवस्थानला खासगी विमानानं ठेकेदाराबरोबर भेट दिल्यानं वादग्रस्त ठरलेले सुधीर मुनगंटीवार...फोटोखरेदी प्रकरणाचे अन पदवीप्रकरणाचे वादळ उठलेले विनोद तावडे... 

...अर्थात, ही नेतेमंडळी झाली ती केवळ पक्षाच्या एका अधिवेशनातील व्यासपीठावरची. मंत्रिमंडळात वादात अडकलेल्या मंत्र्यांची आणखीही मोठी यादी आहे. चिक्की गैरव्यवहारामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव होतं, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी भरलेल्या उमेदवारी अर्जातील शपथपत्रात पत्नीविषयक वाद झाला होता, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुदळे यांच्याकडं सौरपंप खरेदी प्रकरणात बोट दाखवण्यात आलं होतं तसंच जिंदाल कंपनीवर मेहेरनजर दाखविण्यात आल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता, आश्रमशाळांना पुरविलेल्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्यानं आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांना टीकेला तोंड द्यावं लागलं होतं, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पीएंच्या लाचेचे प्रकरणही गाजलं... 

...अर्थात, ही झाली मंत्रिमंडळातील मान्यवरांची यादी, पण मंत्रालयात अन सचिवालयातील फिक्‍सर, दलाल अन अधिकाऱ्यांचं पूर्वीच्या सरकारमधलं रॅकेट अजूनही कायमच असल्याचं तिथं राबता असलेले सांगतात. कामं करण्याचा दरही कमीअधिक प्रमाणात तसाच आहे. महसूलमध्ये जरा जास्तच म्हणजे गडकऱ्यांच्याच भाषेत सांगायचं तर दोन्ही हातांनी ओरपण्याचे प्रकार होत असल्याचं दिसून येतं होतं. असं असलं तरी नगरविकास मधली कामं धुतल्या तांदळासारखी होत आहेत, असा कुणाचा समज असेल तर तो गैर आहे. तिथं 'अगदी वरपर्यंत‘ कायकाय द्यावं लागलं, याच्या खुमासदार कथा देऊन आलेली मंडळी सांगतात. 

...या सगळ्यांची माहिती दिल्लीस्थित, पण एक डोळा महाराष्ट्रावर रोखून असलेल्या गडकऱ्यांना निश्‍चितच आहे आणि त्यामुळंच त्यांनी 'खाणं बंद करा‘, असा 'अविचारी‘ सल्ला दिला नाही. तो बाबूंना-खाबूंना पटणारा नाही. सरकार कोणत्याही पक्षाचं असो, खाणं चालूच असतं, हा अनुभव या ज्येष्ठ नेत्याला असल्यानं (आणि आपण खाऊ नका, असा सल्ला दिला तरी तो कुणी मनावर घेणार नाही, याची खात्री असल्यानं !) त्यानं सगळ्यांना मानवणारा सल्ला दिला, 'खा, पण जपून...पचेल एवढंच खा, अन्यथा तुम्हाला डॉक्‍टरकडं जावं लागेल,‘ असं अपचन झाल्यानं नुकतीच एका नेत्याला मुंबई सोडावी लागली असल्यानं आता इतरेजन हा सल्ला मानतील, अशी अपेक्षा आपण सर्वांनी करायला काय हरकत आहे ? 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com