NEET 2020 : विद्यार्थ्यांना 'मराठी' नकोशी; परीक्षा देणाऱ्यांची संख्या घटली पाच पटीनं!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

महाराष्ट्रात इयत्ता 10वी पर्यंत बहुतांश विद्यार्थी राज्य शिक्षण मंडळातून मराठी माध्यमातून शिक्षण घेतात. 11वीला त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर थेट इंग्रजीमधून गणित, विज्ञान शिक्षण सुरू होत असल्याने त्यांची तारांबळ उडते.

पुणे : वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (नॅशनल एलिजीबीट एंट्रन्स टेस्ट-नीट) मराठीतून पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येला गळती लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठीतून परीक्षा देणाऱ्यांची संख्या पाच पटीने कमी झाली असून, केवळ 6 हजार 258 जणांनी परीक्षा दिली आहे. विद्यार्थ्यांना मराठीतून परीक्षा देण्यासाठी उपलब्ध नसणाऱ्या सुविधा आणि माहितीचा अभाव यामुळे ही संख्या दरवर्षी कमी होत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

'सकाळ' इम्पॅक्ट : 'सीईटी'ची आणखी एक संधी द्या; विना-अनुदानित संस्था संघटनांनी केली मागणी​

राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा होत असली तरी यामध्ये देशातील प्रमुख प्रादेशिक भाषांचेही महत्त्व असले पाहिजे यासाठी 'नीट'मध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत पेपर सोडविण्याची मुभा आहे. इंग्रजी हिंदीसह 11 भाषांमध्ये 'नीट'ची परीक्षा देता येते. यंदा प्रादेशिक भाषेत 1 लाख 29 हजार 763 (8.12 टक्के) विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

महाराष्ट्रात इयत्ता 10वी पर्यंत बहुतांश विद्यार्थी राज्य शिक्षण मंडळातून मराठी माध्यमातून शिक्षण घेतात. 11वीला त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर थेट इंग्रजीमधून गणित, विज्ञान शिक्षण सुरू होत असल्याने त्यांची तारांबळ उडते. 'नीट'मध्ये विचारले जाणारे प्रश्‍न त्यांना समजण्याच्या दृष्टीने व उत्तर बरोबर येण्यासाठी मराठीतून प्रश्‍नपत्रिका असेल, तर उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढू शकते.

पुण्याच्या 'मिनिएचर आर्टिस्टने साकारली अवघ्या तीन मिलिमीटरची विठ्ठलाची मूर्ती​

राज्य शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य अनिल गोरे म्हणाले, 'नीट'चा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी मराठी माध्यम निवडले तरी परीक्षेतून मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतून प्रश्‍न विचारले जातात. विद्यार्थ्यांना त्यामुळे प्रश्‍न कळण्यास सोपे जाऊन योग्य उत्तर निवडता येईल. 2019 मध्ये आम्ही याबाबत महाविद्यालयांमध्ये जाऊन माहिती दिल्याने संख्या वाढली होती, पण यावर्षी पुन्हा कमी झाली आहे. ही परीक्षा घेताना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मराठीसह इंग्रजीतून प्रश्‍न येतील अशीच व्यवस्था करण्याची मागणी यापूर्वीच केंद्र शासनाकडे केली आहे.

'डीपर'चे संस्थापक सचिव हरीश बुटले म्हणाले, "हिंदी, तमीळ यासह इतर भाषांमधून परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली आहे, पण मराठी माध्यम निवडणाऱ्यांची संख्या कमी झाली. राज्यात 'नीट'ची तयारी करण्यासाठी आवश्‍यक सोई सुविधा दिल्या जात नसल्याने हे प्रमाण कमी झाले आहे.''

सुप्रीम कोर्टमध्ये निघाली भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!​

"विद्यार्थ्यांना मराठीतून परीक्षा देण्याची इच्छा आहे, पण कनिष्ठ महाविद्यालयात मराठी शिकवले जात नसल्याने विद्यार्थ्यांची कोंडी होते. 'नीट'ची तयारी सुरू करताना त्यांना शिकवलेलं समजत नाही, त्यासाठी सुरवातीचे दीड-दोन महिने इंग्रजी भाषेची तयारी करून घ्यावी लागते. विद्यार्थ्यांना सुविधा दिली तर ते नक्की मराठीतून परीक्षा देतील.''
- डॉ. अतुल ढाकणे, अध्यक्ष, लिफ्ट फॉर अप्लीफमेंट

प्रमाण कमी होण्याची कारणे :
- मराठी पर्याय निवडला तरी इंग्रजी प्रश्‍नही उपलब्ध असतात याची माहिती नसणे
- महाविद्यालय किंवा खासगी क्‍लासकडून याबाबत माहिती न देणे
- कनिष्ठ महाविद्यालयात मराठीतून न शिकवणे

मराठी माध्यमाचे फायदे :
- विद्यार्थ्यांना प्रश्‍न समजणे सोपे जाते
- उत्तरांची अचूकता वाढल्याने निकाल चांगला लागू शकतो.
- इंग्रजीची भीती जाऊन विद्यार्थी सहज परीक्षा देऊ शकतील.

भाषानिहाय विद्यार्थी संख्या :

भाषा 2019 (टक्केवारी)   2020 (टक्केवारी)
मराठी 31239 (2.06) 6258 (0.39)
हिंदी 179857 (11.84) 204399 (12.80)
असामी 1796 (0.12) 5328 (0.33)
बंगाली 4750 (.031) 36593 (2.29)
गुजराती  59395 (3.91) 59055 (3.70)
कन्नड 2305 (0.15) 1005 (0.06)
उडिया 31490 (2.07) 822 (0.22)
तमीळ 1017 (0.07) 17101 (1.07)
तेलगू   700 (0.05) 1624 (0.16)
उर्दू   1858 (0.12)   1977 (0.12)
     

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No of candidates who select Marathi medium for NEET 2020 exam decresed compared to last year