पोलिस चौक्‍याच ‘संपर्कहीन’

Police
Police

पिंपरी - फोनमुळे सर्व जग जवळ आले असून, माहितीची देवाण-घेवाण सुलभ झाली आहे. मात्र पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील चोवीस चौक्‍या आणि एका पोलिस स्टेशनमध्ये स्वतंत्र दूरध्वनी नंबर (लॅण्डलाइन) नाहीत. दोन चौक्‍यांचे दूरध्वनी अनेक दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना तत्काळ पोलिसांची मदत घेण्यास अडचण येत आहे.

निगडी ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या आकुर्डी चौकी वगळता यमुनानगर व प्राधिकरण चौकीला दूरध्वनी नाही. पिंपरी ठाण्याच्या मोहननगर, पिंपरी व संत तुकारामनगर पोलिस चौकीला स्वतंत्र दूरध्वनी आहे. मात्र संत तुकारामनगर चौकीच्या दूरध्वनीवरून आवाजच जात नाही. भोसरी ठाण्याला दोन दूरध्वनी असून, एक दूरध्वनी अनेक दिवसांपासून खराब आहे. एमआयडीसी भोसरी ठाण्याच्या आधिपत्याखालील मोशी व लांडेवाडी चौकी येत असून, या दोन्ही चौक्‍यांना दूरध्वनी नाहीत. हीच परिस्थिती हिंजवडी ठाण्याच्या बावधन, म्हाळुंगे, हिंजवडी एमआयडीसी चौकी व सांगवी पोलिस ठाण्याच्या नवी सांगवी, पिंपळे सौदागर, जुनी सांगवी चौकीची आहे. पिंपळे सौदागर व नवी सांगवी चौकीचे कामकाज एकच पथक पाहत असल्याने कर्मचाऱ्यांची मोठी धावाधाव होते. 

वाकड ठाण्याच्या काळेवाडी, थेरगाव, वाकड चौकी, दिघी ठाण्याच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या चऱ्होली, दिघी चौकी आणि तळेगाव दाभाडे ठाण्याच्या परंदवडी व तळेगाव स्टेशन चौकी, 

तळेगाव दाभाडे स्टेशन अंतर्गत येणारी इंदोरी चौकी, चाकण स्टेशनमध्ये येणारी पाईट चौकी, चिखली पोलिस स्टेशनची कुदळवाडी, रुपनगर व साने चौक पोलिस चौकीत दूरध्वनी नाहीत. तसेच देहूरोडची देहूगाव चौकीतही तीच स्थिती आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वतःचे वैयक्तिक दूरध्वनी वापरावे लागतात. विविध शासकीय आदेश किंवा तातडीच्या कारणासाठी संपर्क करणे अवघड होते, असे पोलिसांनी सांगितले.

बऱ्याचदा पोलिस नियंत्रण कक्षाचा (कंट्रोल रूम) १०० क्रमांक मोबाईलवरून लागत नाही. त्या वेळी नागरिकांना पोलिस ठाणे किंवा चौकीला संपर्क करता येऊ शकतो, त्यासाठी प्रत्येक पोलिस चौकी आणि पोलिस स्टेशनमध्ये लॅण्डलाइनची सुविधा असणे आवश्‍यक असल्याचे नागरिकांनी सांगितले. 

तळेगाव पोलिस स्टेशन फोनच्या प्रतीक्षेत 
तळेगाव एमआयडीसी ठाणे अनेक दिवसांपासून दूरध्वनीच्या प्रतीक्षेत आहे. तर देहूरोड ठाण्याचा दूरध्वनी खराब झाला असून, त्यातून आवाज येत नाही. 

कासारवाडी चौकी गेली कुठे? 
भोसरी ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या कासारवाडी चौकीमध्ये दरोडा व खंडणी विरोधी पथकाचे कार्यालय सुरू झाले आहे. त्यामुळे या चौकीतील कर्मचाऱ्यांना अन्यत्र बसून, आपला कारभार चालवावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com