esakal | बारामती पॅटर्ननं करून दाखवलं; महाराष्ट्रालाही यश येणार का?
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

मुंबई पुण्यासह राज्याच्याविविध भागातून निर्बंध शिथील झाल्यावर लोक आले,मात्र स्वताःहून किमान दहा दिवस घराबाहेर न पडण्याचे पथ्य सर्वच जण पाळत असल्याने कोरोनाचा फैलाव झालेला नाही

बारामती पॅटर्ननं करून दाखवलं; महाराष्ट्रालाही यश येणार का?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : शहरात गेल्या साठ दिवसांपासून म्हणजेच दोन महिन्यांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्याने बारामती शहर आता ख-या अर्थाने कोरोनामुक्त झाले आहे. प्रशासकीय स्तरावर झालेले उत्तम प्रयत्न व त्याला बारामतीकरांनी दिलेली साथ या मुळे हे यश प्राप्त झाले आहे. प्रशासनाने सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणांवर केलेले नियंत्रण, पाळलेला कडक लॉकडाऊन, प्रारंभी भीलवाडा व त्यानंतर राबवलेला बारामती पॅटर्न, उत्स्फूर्त लोकसहभाग या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे बारामती शहर कोरोनामुक्त झाले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गेल्या साठ दिवसात बारामती शहरात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध भागातून निर्बंध शिथील झाल्यावर लोक आले, मात्र स्वताःहून किमान दहा दिवस घराबाहेर न पडण्याचे पथ्य सर्वच जण पाळत असल्याने कोरोनाचा फैलाव झालेला नाही. इंदापूर व दौंडमध्ये कोरोना रुग्ण सापडत असल्याच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर तुलनेने कोरोनामुक्त राहिले आहे. 

दुसरीकडे बारामतीतील रुई रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरु झाले असून कुणीही संशयित वाटल्यास तातडीने त्याच्या घशातील द्रावाचा नमुना येथे संकलित केला जात आहे. पुरुष व महिलांसह इथे अतिदक्षता विभागही तयार करण्यात आला आहे. गरज भासल्यास रुग्णांना येथे थांबवून घेतले जाते. बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाची तपासणी होत असल्याने त्या साठी पुण्याला जाण्याची गरज भासत नाही, त्या मुळे वेळेसह इंधन व पैशांचीही बचत होते आहे. 

कोरोनाबरोबर जगण्यासाठी नव्या जीवनशैलीचा कानमंत्र 

बारामतीचै दैनंदिन जीवन गेल्या काही दिवसांपासून सुरळीत झाले असून सकाळी नऊ ते पाच या वेळेत व्यवसायास काही अपवाद वगळता प्रशासनाने परवानगी दिली आहे. बहुसंख्य दुकानदारांकडून सॅनेटायझरचा वापर, मास्कचा वापर, हँडग्लोव्हजचा वापर, येणा-या ग्राहकांचा तपशिल नोंदविणे ही कामे नियमितपणे करीत आहेत. 

थोडी अजून शिथीलता हवी
संध्याकाळी पाच ऐवजी किमान सात वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी. कामावर जाणा-यांना खरेदी करणेच अवघड होऊन बसते. अनेक जण आठ वाजता कामाला जातात संध्याकाळी सहाच्या सुमारास ते घरी परत येतात, अशांची या वेळेने गैरसोय होत आहे.- नरेंद्र गुजराथी, अध्यक्ष, बारामती व्यापारी महासंघ, बारामती. 

शहरातील बहुसंख्य हॉटेल्स तीन महिन्यांपासून बंद आहेत. आता बारामती कोरोनामुक्त झालेली असल्याने हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी देण्यास हरकत नाही. शासन स्तरावर जे नियम घालून दिले जातील, त्याचे पालन सर्वच हॉटेल व्यावसायिक करतील. 
- प्रवीण आहुजा, हॉटेल व्यावसायिक.